नाशिक – कोरोनाच्या काळात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असताना सर्वांच्या सहकार्यातून अथक प्रयत्नातून मुबलक ऑक्सिजन पुरवठा आपण करू शकलो. जिल्ह्याला १३० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. आज तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपण एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करतो आहोत. ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार पंकज भुजबळ, सरपंच अलका बनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल राठोर, डॉ. रोहन मोरे आदींसह रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या मार्च २०२० महिन्यापासून आपण सर्व कोरोनाच्या जागतिक महामारीला तोंड देत आलो आहोत. पहिल्या लाटेमध्ये अचानक आलेल्या या संकटाला आपण सक्षमपणे सामोरे जात उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून होतो. सर्वांनाच नवीन असणारा हा आजार व त्याची तीव्रता याबद्दल सर्वजण अनभिज्ञ असल्याकारणाने उपलब्ध असलेल्या साधन सामग्री नियोजन करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्याही खूप जास्त झाली होती. ऑक्सिजन वर अवलंबून असलेल्या रुग्णांची संख्या देखील जास्त होती आणि अशातच ऑक्सिजनची मागणी व टंचाई पूर्ण राज्यभर निर्माण झाली होती. त्यातही नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उत्तम रित्या नियोजन करण्यात आले होते.
मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त रुग्ण संख्या ही जवळपास ५२ हजाराच्या घरात गेली असताना दिवसाला लागणारी ऑक्सिजनची मागणी जवळपास १३० मॅट्रिक टन प्रति दिवसाला एवढी होती. तिसरा लाटेच्या अनुषंगाने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही ऑक्सिजनची मागणी जवळपास तिप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे आज आपण नाशिक जिल्ह्यात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असेल याचे योग्य नियोजन करण्यात आलेले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले या नियोजनामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट, ऑक्सिजन स्टोरेज टँक, ड्युरा सिलेंडर्स, जंबो सिलेंडर्स, ऑक्सिजन काँन्सट्रेट ऑक्सिजनचा गरज पूर्ण करणारी सामग्री मुबलक प्रमाणात आज जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २९ आरोग्य संस्थांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्टचे काम चालू आहे. रुग्णालयाचे प्रकार आणि तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता तेथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणजेच पीएसए प्लांट्स, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज एलएमओ टॅंक्स, २३० लि. ड्युरा सिलेंडर्स, मोठे आणि छोटे जम्बो सिलेंडर्स याचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यानंतर त्वरित निफाड तालुक्यातील रुग्णांना कोविड काळात सुविधा मिळण्याकरता त्याचे रूपांतर डीसीएचसी मध्ये करण्यात आले. पुढील नियोजनाचा भाग म्हणून आज पिंपळगाव येथे २०० खाटांची उपलब्ध करण्यात आलेली असून येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन करण्यात येत आहे. या प्लांटच्या माध्यमातून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत दोन वेळा मंत्रिमंडळात मागणी केली असून ज्या ठिकाणी गरज आहे त्याठिकाणी स्टाफ नेमण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी आमदार बनकर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम रित्या काम केले. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि परिचरिकांचे योगदान मोलाचे आहे.
या रुग्णालयात २०० बेड्सच्या ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही त्यामुळे पिंपळगाव बसवंत रुग्णालयात १०० बेड्सची व्यवस्था कायम ठेऊन स्टाफ कायम करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अद्यापही कमी असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबतही नियोजन करण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात म्हणाले, या ऑक्सिजन जनरेशन प्लांट ची क्षमता २० एनएम असून जवळपास ६० ते ६५ जम्बो सिलेंडर दर दिवसाला भरले जाणार आहेत. त्यांना पूरक क्षमता म्हणून ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव येथे १० केएल ऑक्सिजन स्टोरेज टँक, २३० लिटरचे तीन ड्युरा सिलेंडर्स,११० जम्बो व ८५ छोटे सिलेंडर्स आणि १० ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.