जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात गणपती बाप्पाचे शुक्रवार, दि.10 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी घरा-घरांत अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले.
त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप चौक म्हणजेच रिंग रोड परिसर, टॉवर चौकाजवळील महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागांत महापालिकेच्या परवानगीने याहीवर्षी बुधवार, दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी दुपारपासून शुक्रवार, दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीपर्यंत गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर टाकलेला होता. त्यामुळे आधीच ‘कोरोना’चे संकट आणि सतत कोसळणार्या पावसामुळे रोगराई उद्भवून त्या-त्या भागातील रहिवासी, नागरिकांपुढे कोणत्याही प्रकारे आरोग्याचा प्रश्न उभा राहू नये तसेच महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केलेला जळगाव शहर सुंदर अन् स्वच्छतेत सदैव अग्रेसर राहावे, हा संकल्प लक्षात घेऊन स्वजबाबदारी पार पाडण्यासाठी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन या स्वतः आज शनिवार, दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हातात झाडू, फावडा घेऊन रस्त्यावर उतरल्या अन् शहर स्वच्छतेचे हे अभियान त्यांनी संबंधित चौक परिसराच्या ठिकाणी जाऊन राबविले. जवळपास तीन-साडेतीन तासांपर्यंत हे अभियान राबविण्यात येऊन संबंधित कचरा, निर्माल्याची महापालिकेच्या ट्रॅक्टर, घंटागाडी आदी वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावली.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी राबविलेल्या या स्वच्छता अभियानात महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी श्री.लोमेश धांडे, श्री.संजय अत्तरदे, श्री.सुरेश भालेराव, श्री.सूरज तांबोळी (रिंग रोड परिसर), श्री.रमेश कांबळे, श्री.रवी सनकत (बळीराम पेठ परिसर), श्री.नंदू साळुंखे (पिंप्राळा परिसर), वॉटर ग्रेस कंपनीचे श्री.नितीन पाटील, शोएब खाटीक व कर्मचारी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.विराज कावडिया, श्री.अमित जगताप, श्री.प्रितम शिंदे, श्री.सागर सोनवणे, श्री.जयेश पवार, श्री.दीक्षांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते, स्वयंसेवक, तसेच विविध प्रभागांत नियुक्त महापालिका सफाई कर्मचार्यांचा वाटाही तितकाच मोलाचा राहिला. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभियानाची जळगावात दिवसभर सकारात्मक चर्चा होती. किंबहुना नागरिकांनी त्यांच्या या शहराप्रती असलेल्या संवेदनारूपी कृतीचे तोंडभरून कौतुकही केले.
रिंग रोड येथील महाराणा प्रताप चौकातील ‘विकास’चे दूध विक्रेते श्री.आनंद बडगुजर म्हणाले, की मी गेल्या 25 वर्षांपासून येथे दूध विक्री करतो. गणेशमूर्ती, पूजा साहित्य तसेच फूल विक्रेते कचरा व निर्माल्य तसेच सोडून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरायची. मात्र, आज महापौर अन् महापालिका कर्मचार्यांच्या सतर्कतेतून श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी सकाळीच हा चौक, रिंग रोड व आकाशवाणी चौकाचा परिसर संपूर्णपणे स्वच्छ केला गेला. खरे म्हणजे महापौर व महापालिकेची नागरिकांप्रती व्यक्त केली गेलेली ही कृतज्ञता म्हटली पाहिजे. महापौर व महापालिका कर्मचार्यांच्या या अभियानाचे मी मनापासून स्वागत करतो व धन्यवाद देतो.
महात्मा गांधी रोड परिसरातील विविध व्यापारी संकुलांतील विक्रेत्यांनी सांगितले, की हरितालिकेच्या आधीपासून या भागात विविध पूजा साहित्य, फळे विक्रीची दुकाने थाटली जाऊन श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी संबंधित विक्रेते कचरा व निर्माल्य तसेच टाकून निघून जातात. याचा आम्हा दुकानदारांना मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा. मात्र, आज महापौर व महापालिकेतर्फे श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी आमच्या दुकानांसमोर राबविल्या जाणार्या स्वच्छता अभियानाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. हे अभियान यापुढेही असेच सुरू राहो, हीच अपेक्षा.
महापौरांची परमेश्वराला प्रार्थना
दरम्यान, या अभियानासंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की आजचे स्वच्छता अभियान हे माझ्या संकल्पाचाच भाग आहे. तो पूर्णतेसाठी मी महापालिका अधिकारी, सफाई कर्मचार्यांसह स्वयंसेवी संस्थांना सोबत घेत सदैव तत्पर व कटिबद्ध आहे अन् यापुढेही राहील. मी श्रीगणेशाला प्रार्थना करते, की आम्ही शहर स्वच्छतेच्या कार्यात सदैव प्रामाणिकपणे अग्रेसर राहूच. मात्र, ‘कोरोना’रूपी संकटातून आम्हा शहर व जिल्हावासीयांची कायमची मुक्तता कर व सर्वांना सुख-समृद्धी लाभून निरामय आरोग्य लाभू दे.