धानोरा – धानोरा ता.चोपडा येथे सोमवारी (ता.३०) सकाळी ११ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच सुनिता कोळी यांच्या परवानगीने ग्रामसेवक इंधे यांनी गावातील मुख्य समस्या असलेल्या पाणीपुरवठाच्या समितीची निवड करण्यासाठी ग्रामस्थांमधून निवड करण्यासाठी नावे सुचविण्यास सांगितले असता, यावरून ग्रामसभेत सुमारे एक तास चांगलेच वादंग निर्माण झाले होते.
यांनतर पुन्हा ग्रामस्थांची समजूत काढून ग्रामसभा सुरु करण्यात आली. यात पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील तर सचिव पदी प्रल्हाद कोळी यांची सर्वानुमते निवड झाली. तसेच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पन्नालाल पाटील यांची निवड करण्यात आली. पुढे ग्रामसेवक विकास इंधे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधी अंदाजित रक्कम ३० लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगत याद्वारे अंगणवाडी स्वच्छतागृह व गटारी बांधकाम केले जाणार असल्याचे सांगितेले. तर गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून लवकरच ती योजना कार्यान्वित होणार असल्याचे ग्रा.प. सदस्य माणिकचंद महाजन यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या मागील १४ व्या वित्त आयोगच्या शिल्लक निधी बाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता यावेळी ग्रामसेवकांनी यावर मी नवीन असून मला अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून मला याबाबत काही माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी सध्या असलेल्या ग्रामसेवकांनाच धानोरा ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी नियुक्ती करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. गावातील पाणीपुरवठ्याचे साहित्य आणि लाईट यासाठी ठेकेदाराला निविदा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील, सरपंच सुनिता कोळी, उपसरपंच विजय चौधरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासकाच्या काळात झालेल्या कामांची चौकशीची मागणी
कोरोना काळात सरपंचांच्या कार्यकाळ समाप्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. यात धानोरा ग्रामपंचायत मध्ये देखील प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. या कालावधीत प्रसासकाने आपला मनमानी कारभार चालवत सोबत गावातील व पंचातीच्या इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपये खर्च केले असून, यातून काही ठिकाणी थातूरमातुर कामे देखील केली आहेत. यात ग्रामपंचायतीच्या बाजूलाच गावातील ग्रामस्थांना शुद्ध आरओ चे पाणी मिळावे यासाठी मोठे पत्रांच्या शेड उभे केले असले तरी ते आजच्या स्थितीत बंद आहे. यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते मिळून प्रशासकांनी केलेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी या ठरावाबाबत ज्ञानेश्वर सोनवणे यांनी विरोध दर्शवत ग्रामसेवकांनी शंभर विरोधात एक ने कामाची चौकशी करण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगितले.
दिव्यांग बांधव निधीपासून वंचित
गेल्या सरपंचांच्या काळात दिव्यांगाना ग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के निधीचा धनादेश मोठ्या थाटामाटात त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला होता. यावेळी याची प्रसिद्ध मध्यमांद्वारे प्रसिद्धी देखील केली होती. परंतु तो धनादेश दिव्यांग बांधवांना अद्यापही देण्यात आला नसल्याने यात काही गैरव्यवहार झाला असल्यास चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मुस्लीम समाज मंदिर दुरुस्तीचा ठराव मंजूर
गावातील मुस्लीम समाजातील समाजमंदिराची दैनावस्था झाली असून मुस्लीम बांधवांनी याची दुरुस्ती करण्यात यावी असा अर्ज ग्रामसभेत सादर केला होता. यावर ग्रामस्थांनी एकमताने हा ठराव मंजूर करीत इस्लामपुरा भागातील गटारी देखील दुरुस्ती केले जाणार आहे.