जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बेवारस असलेल्या व्यक्तीस उपचारानंतर आधार देण्यासाठी धुळे येथील सावली वृद्धाश्रमाने पुढाकार घेतला. त्यामुळे एका निराधारास हक्काचा निवारा व काळजी घेणारी माणसे मिळाली. प्रसंगी संस्थेच्या प्रमुखांनी अधिष्ठात्यांची भेट घेत रुग्णाचा ताबा घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.
हिरामण रघुनाथ पाटील (वय ५०) या व्यक्तीस शारिरीक अशक्तपणा, चेहऱ्यावर, डाव्या डोळ्यांच्या खोबणीत तसेच शरीरात इन्फेक्शन व त्वचारोग झालेला होता. त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. परिणामी त्यांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न होता. धुळे येथील रहिवासी असल्याचे ते सांगतात. या रुग्णाला प्राथमिक स्तरावर उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यावर धुळे येथील श्रमिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था, धुळे संचलित सावली वृद्धाश्रमचे अध्यक्ष आप्पा खताळ यांनी जबाबदारी घेण्याचे कळविले. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील समाजसेवी अधीक्षक संदीप बागुल यांनी समन्वय साधला.
त्यानुसार आप्पा खताळ यांनी वाहनातून धुळे येथे हिरामण पाटील यांना सुश्रुषा व पुनर्वसनकरीता घेऊन घेले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झंवर यांनी वाहनाचा खर्च दिला. त्याआधी आप्पा खताळ यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. प्रसंगी आप्पा खताळ यांच्या वृद्धाश्रम संदर्भात असलेल्या कामगिरीचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी कौतुक केले. एका निराधार व्यक्तीस मानसिक व शारीरिक आधार देणे हि मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. रुग्णावर उपचार करण्याकामी नेत्रशल्यचिकित्सा शास्त विभाग प्रमुख डॉ. प्रसन्न पाटील, औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. प्रसाद खैरनार, डॉ. उमेश जाधव यांच्यासह परिचारिका, कक्षसेवकांनी परिश्रम घेतले.