जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरणाचा भाग म्हणून परिसरात जळगावची जागतिक ओळख असलेल्या केळी या फळाची अनेक रोपे लावण्यात आली आहे. आता यापैकी एका झाडाला आकर्षक केळफूल आणि सुमारे ५ डझन केळ्यांची फणी लागली आहे. त्यामुळे परिसरात नैसर्गिक चैतन्य निर्माण झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या १० महिन्यात सुशोभीकरणामुळे प्रसन्नता निर्माण झाली आहे. याठिकाणी महाविद्यालयाच्या आवारामध्ये गेट नं.२ मधून आत आल्यावर जलमंदिरापर्यंत आणि कक्ष सी-१ (नेत्र कक्ष) येथे आकर्षक रंगाचे पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहे. सोबत अधिष्ठाता कार्यालयालागून बसविलेले पेवर ब्लॉक व त्याजवळ लावलेली विविध फुलांची झाडे, केळीची झाडे परिसराची शोभा वाढवितात. नेत्र कक्षाकडून नर्सिग कॉलेजकडे जातांना लावलेल्या पेवर ब्लॉकजवळदेखील केळीची झाडे लावली आहे. यामधून जळगावचे प्रमुख फळ असलेल्या केळी बागेची संस्कृती जोपासण्यात आली आहे.
यातील केळीच्या एका रोपाला सुमारे ५ डझन केळ्यांचा घड लागला असून सोबत आकर्षक केळफूलदेखील परिसराच्या सौंदर्यात भर पाडत आहे. या रोपांमधल्या पानातून किरमिजी रंगाचे केळफ़ूल बाहेर पडून जमिनीच्या दिशेने वाढलेले आहे. या केळफूलाची एकेक फणी उकलत जाऊन उमललेली आकर्षक अशी केळी मन मोहून टाकत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, नातेवाईकांना मनमोहक परिसरामुळे सकारात्मकता निर्माण होत आहे.
“रुग्णाला रुग्णालयात येताना प्रसन्न वाटावे, परिसरात वातावरण सकारात्मक व आनंदी असावे या दृष्टिकोनातून सुशोभीकरणाचा भाग म्हणून जळगावची ओळख असलेली केळीची रोपे लावलेली आहे. आता तर रोपांना केळीची फणी येत असल्याने सौंदर्यीकरणात अजून भर पडली आहे.”
– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता