जळगाव, प्रतिनिधी । येथील जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळाचा मानाचा गणपती आणण्यासाठी मंडळाचे पथक मुंबई येथे शनिवारी दि. २८ ऑगस्ट रोजी रवाना झाले आहे. तसेच रविवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वा. जळगावच्या राजाच्या पाट पूजन सोहळा होणार असून भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी जळगावच्या राजाच्या आगमनाची प्रतीक्षा भाविकांना लागून असते. यंदाही जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळातर्फे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळात सामाजिक व आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाचा आहे. हा मानाचा गणपती आणण्यासाठी शनिवारी कार्यकर्ते पंकज पाटील, कुणाल पंधारे, योगेश तायडे, उमेश चौधरी, डॉ. हेमचन्द्र काळुंखे हे रवाना झाले. सुरुवातीला नारळ फोडून वाहनांची पूजा करून प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी पियुष गांधी आदी उपस्थित होते.
जळगावच्या राजाची मूर्ती लालबाग येथील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार उदय खातू यांनी बनवली असून त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील अनेक मानाचे गणपती खातू यांनी बनवले असून मूर्ती आणल्यावर जळगावच्या राजाचे पाटपूजन हे रविवारी २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता महानगरपालिकेच्या इमारतीखाली होणार आहे. जगदीश जोशी हे सपत्नीक पूजा करणार आहेत. पाट पूजनाला भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
“दरवर्षी नेहरू चौक मंडळाच्या ‘जळगावचा राजा’ ची वाट जळगावकर आतुरतेने पाहतात. यंदा मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार खातू परिवार यांनी जळगावच्या राजाची मूर्ती घडविली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून श्रद्धापूर्वक श्री गणेशाची स्थापना करण्यात येईल.”
– अजय गांधी, अध्यक्ष, नेहरू चौक मित्र मंडळ