शिंदखेडा, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पेट – PET (पीएचडी प्रवेश परीक्षा) परीक्षेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा पेट परीक्षेचे आयोजन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक असून कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दोन वर्षांपासून पेट परीक्षेचे आयोजन केलेले नाही, परंतु आता कोविड – १९ चा प्रादुर्भाव निवळला असून शाळा – महाविद्यालये देखील सुरू झालेली आहेत. शिवाय अन्य विद्यापीठांच्या पेट परीक्षेचा कार्यक्रम जाहीर झालेला असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही पेट परीक्षा घेणेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. तसेच दोन वर्षे पेट परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थी मोठा कालावधी पेटच्या संधीपासून वंचित राहिल्याने मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत, इच्छुक विद्यार्थी पेट परीक्षा कधी होईल या प्रतीक्षेत असून त्यांना तात्काळ संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने तात्काळ नियोजन करून पेट परीक्षेचा कार्यक्रम घोषित करावा व पेट परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी अशी मागणी सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी निवेदनाद्वारे करून कुलगुरूंसोबत चर्चा केली. त्यावर कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनी पेट परीक्षा लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन दिले.