जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात एकूण ११४ रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
योजनेमधून २२ जुलै ते २६ ऑगस्टपर्यंत कोरोनाविरहित ११४ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्षभरात किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनादेखील लाभ झाला आहे.
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक), अन्नपूर्णा, अंत्योदय कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे. यासाठी ओरिजनल आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असते.
योजनेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश रामानंद, सदस्य सचिव तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, संदीप माळी, तेजस वाघ हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात अथवा अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८७६७३३७८१५) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
“ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा उत्तम लाभ होत आहे.”
– डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव