जळगाव, प्रतिनिधी । कोणत्याही गावाच्या विकासात तरूणांची भूमिका ही सर्वात महत्वाची असते, यामुळे तरूणांनी विकासासाठी प्रेरणास्थान बनावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. भवरखेडा गावाने आपल्याला भरभरून दिले असून याची प्रचिती आज केलेल्या स्वागतातून दिसून आले आहे. या प्रेमातून उतराई होण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला असून या अनुषंगाने आता गावासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा देखील ना. पाटील यांनी केली. ते भवरखेडा येथील युवासेनेनेच्या शाखेच्या कार्यक्रमात बोलत होते.*
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे युवासेनेच्या उदघाटनासाठी भवरखेडा येथे आले असता, त्यांचे ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. या जंगी स्वागतानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात आबालवृध्दांचा समावेश होता. यातील तरूणाईचा सहभाग हा अतिशय लक्षणीय असाच होता. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते युवासेनेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजचा तरूण हा आधुनीक असून त्याला कुणी फसवू शकत नाही. मात्र आज तरूणाईच्या उत्साहाला नवीन दिशा देण्याची गरज आहे. ज्यांची काम करण्याची धमक आहे त्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाकडे वळावे. नोकरी करणार्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे. युवासेनेच्या सदस्यांनी आधी घरची कामे करावीत, आणि फावल्या वेळेत संघटनेचे काम करावे असा सल्लादेखील त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत झालेल्या लक्षावधी तरूणांमुळेच शिवसेना भक्कमपणे टिकून आहे. आज उध्दवजी ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखच नसून राज्याचे कुटुंब वत्सल प्रमुख असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
पालकमंत्र्यांनी युवकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगतांना सोशल मीडियाचा आवश्यक तितकाच वापर करण्याचा सल्ला दिला. तरूणांनी संस्काराच्या मार्गावरून चालत समाजाचा विकास करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी विवरे सरपंच किरण पाटील , भगवान महाजन, माजी उपसभापती डी.ओ. पाटील , महिला आघाडीच्या जनाबाई पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, निंबातात्या पाटील, शाहरुख पटेल, नितीन पाटील, पिंटू पाटील, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे , अमोल पाटील , न. पा. गटनेते पप्पू भावे , प्रमोदबापू पिंपळे, उपसरपंच नितीन पाटील , मोहन महाजन , भानुदास पाटील, सुधाकर पाटील, आदी उपस्थित होते.