जळगाव – शहरातील निमखेडी शिवारातील गट नं. 26 अर्थात चंदूअण्णानगर परिसरातील दीडशे-दोनशे रहिवाशांनी आज गुरुवार, दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी सांडपाणी विल्हेवाटीसाठी गटारी नसणे, कचर्याचे संकलन न होणे, पथदीप बंद असणे, रस्त्यांची दुरवस्था असणे आदी मूलभूत नागरी सोयी-सुविधांप्रश्नी आक्रमक रूप धारण केले.
सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास या परिसरातील रहिवाशांनी संतप्त होत या भागातून कचरा डंपिंग कार्यस्थळाकडे जाणार्या घंटागाड्या, ट्रॅक्टर आदी वाहने रस्त्यावरच आडवून ठिय्या मांडला. यासंदर्भातील माहिती प्राप्त होताच जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी भेट दिली व संतप्त नागरिकांची भावना समजावून घेतली. त्यानंतर सांडपाणी विल्हेवाटीसाठी गटारींसह कचरा संकलन करणा़र्या घंटागाड्या दररोज या भागांत वेळेत नेण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांशी फोनवरून चर्चा करून आदेशित केले. तसेच रस्त्यांचा प्रश्न निधी मिळताच पावसाळ्यानंतर सोडविला जाईल, असे सांगत आश्वस्त केले. याप्रसंगी संतप्त नागरिकांचे यासंदर्भातील सह्यांचे निवेदनही महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी स्वीकारले.
याप्रसंगी चंदूअण्णानगर परिसरातील रहिवाशांनी आम्ही या भागातील विविध नागरी समस्यांप्रश्नी गेल्या 2016, 2019 मध्ये तत्कालीन सत्ताधार्यांची यासंदर्भात भेट घेतली व निवेदनेही दिली. मात्र, आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेले नाही. पत्रव्यवहाराचाही उपयोग झालेला नाही. या भागात सांडपाणी विल्हेवाटीसाठी गटारी नाहीत, कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत नाही, पथदिवे बंद आहेत, रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आम्हा रहिवाशांसाठी आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सध्या पावसाळा असल्याने साथीचे रोग वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरी समस्या तत्काळ सोडविल्या जाऊन आम्हाला न्याय मिळावा. त्यावर महापौर सौ.जयश्री महाजन यांनी परिसराची पाहणी करीत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून गटारींचे काम, पथदिवे लावणे तसेच घंटागाड्या दररोज नेल्या जाव्यात यासंदर्भात आदेशित केले. तसेच निधी मिळताच पावसाळा संपल्यावर रस्त्यांची कामे केली जातील, असे सांगत आश्वस्त केले. या भागातील नगरसेविका सौ.प्रतिभा पाटील यांच्यासह परिसरातील रहिवाशी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.