शिरसोली ता. जळगाव – श्री. हनुमान हे शक्ती प्रदान करणारे शक्तीपीठ असून तरूणांनी बलोपासना करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या मदतीने तालुक्यातील शिरसोली येथे आज श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारानंतरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील श्रीकृष्ण मंदिराने उभारलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक दात्यांनी मदत केली होती. यातून मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिरातर्फे पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो. ही दोन्ही गावे जळगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतीकदृष्ट्या अतिशय महत्वाची गावे आहेत. तालुक्याच्या राजकारणात या गावाची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. गावाच्या विकासासाठी आपण आधीच मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. यात प्रामुख्याने शिरसोली प्र. न. गावासाठी तब्बल दोन कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला जल मिशन योजनेत समावेश केला असून तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले असून याच्या कामाला चालना मिळाली आहे. शिरसोली प्र.न. या गावाच्या ग्राम सचिवालयासाठी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याची निविदा निघालेली आहे. यामुळे येथे अगदी फर्निचरसह अद्ययावत असे ग्राम सचिवालय उभारण्यात येणार आहे. यासोबत दोन्ही गावांच्या विकासासाठी आपण निधीचा कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, श्री. हनुमान हे शक्ती देणारे शक्तीपीठ आहे. यामुळे गावातील तरूणांनी मारूतीरायाची उपासना करून बलोपासनेला प्राधान्य द्यावे. तर वैयक्तीक आणि सामूहिक आयुष्यात स्वच्छतेचा अंगीकार करावा. यंदा हवा तितका पाऊस झालेला नाही. यामुळे इच्छापूर्ती हनुमान मंदिरात नतमस्तक होऊन सर्वत्र धो-धो पाऊस पडून आबादानी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी पं. स. माजी सभापती नंदलाल पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण , सरपंच प्रदीप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, शेख रहीम भाई, मुरलीधर ढेंगळे, शेणफडू पाटील, श्रावण ताडे, श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मराठे, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माधव साबळे, देवेंद्र सोनवणे, विनोद मराठे व निबा पाटील, उमाजी बानगळे, दयाराम धामणे, रघुनाथ मराठे, देवचंद खैरे, देविदास साबळे यांच्यासह शिरसोली व परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मंदीर उभारणीसाठी देणगी देणाऱ्या व लोकसहभाग देणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अर्जुन पाटील मानले.