पंढरपूर – कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.
आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाले असून शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.