जळगाव – शहराची वाढीव वस्तीत असलेल्या ममुराबाद मार्गावर प्रजापतनगरच्या मागील बाजूला पवननगर, रेल्वे सातखोल्या परिसरातील नागरिकांच्या सातत्याने नागरी समस्यांसंदर्भात तक्रारी होत्या. याबाबत मनपा प्रशासनाकडे नागरिकांनी निवेदन देखील सादर केले होते.या अनुषंगाने आज दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली व पावसामुळे असलेला कच्चा रस्ता हा प्रचंड खराब झाल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तेथील रस्ते व स्वच्छतेची गल्लीबोळात जाऊन पाहणी केली. तसेच या भागातील नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणी समजावून घेतल्या. त्यानंतर उपस्थित महापालिकेच्या अधिकार्यांना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. आरोग्य निरीक्षक श्री.एस.पी.अत्तरदे, बांधकाम विभागाचे श्री.संजय पाटील, वीज विभागाचे श्री.संदीप मोरे, प्रकल्प अधिकारी श्री.योगेश बोरोले यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शहराची वाढीव वस्तीत असलेल्या ममुराबाद मार्गावर प्रजापतनगरच्या मागील बाजूला पवननगर, रेल्वे सातखोल्या परिसरातील नागरिकांच्या सातत्याने नागरी समस्यांसंदर्भात तक्रारी होत्या त्या आज दुपारी प्रत्यक्ष पाहणी दौर्यात समजावून घेतल्या. यामध्ये पावसामुळे दुरवस्था झालेले कच्चे रस्ते, ठिकठिकाणी साचलेले पाणी, साफसफाई, पथदीप आदींचा समावेश होता. त्यावर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधित नागरिकांना आश्वासित करत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी साचलेले पावसाचे पाणी चारी करुन रस्त्याच्या कडेला मार्गस्थ करा, कॉलनीत खुल्या भूभागावर व रस्त्याच्या कडेला असलेली घाण काढून ते ठिकाण संपूर्णपणे स्वच्छ करा, कच्च्या रस्त्यांवर वेस्ट मटेरिअल किंवा मुरुम टाकून ते लेव्हलिंग करा, जेथे पथदीप नाहीत ते नव्याने लावण्याची प्रक्रिया राबवा, असे आदेश उपस्थित अधिकार्यांसह आरोग्य निरीक्षकांना दिले. तसेच अंतर्गत नवीन रस्त्यांची सर्व कामे पावसाळ्यानंतर अग्रक्रमाने पूर्ण होतील, अशी ग्वाहीही यावेळी उपस्थित नागरिकांना दिली.
यावेळी या परिसरातील नागरिकांनी आमचा वाढीव वस्तीचा भाग असल्याकारणाने मुख्य रस्त्यापासून आमची कॉलनी जवळपास अर्धा किलोमीटर लांब आहे, किमान तो रस्ता तरी दुरूस्त करून चालण्याजोगे करावा ही मागणी केली. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर असलेल्या या समस्यांकरिता आपण महापौर या नात्याने तत्काळ या भागाला भेट देऊन आमच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले त्याबद्दल आम्ही अतिशय समाधानी आहोत असे यावेळी परिसरातील रहिवाश्यांनी सांगितले.