जळगाव – केंद्र सरकारने कडधान्यावरील स्टॉक लिमिटचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार 16 जुलै बंद रोजी राहतील, अशी माहिती जिल्हा आडत व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी दिली आहे.
भारतीय उद्योग व्यापार महामंडळ (नवी दिल्ली) ने आवाहन केलेल्या भारत बंदला पूर्णतः समर्थन देण्याचा निर्णय जळगाव जिल्हा आडत व व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. यात शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्यांनी शुक्रवारी बाजार समिती परिसरात शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कडधान्य स्टॉक लिमिटचे बंधन मागे घेण्याबाबत वारंवार विनंती करुनसुद्धा सरकार शेतकर्यांची व व्यापार्यांची रास्त मागणी मान्य करीत नाही. म्हणून शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
केंद्र सरकार ने कडधान्यांवरील स्टॉक मर्यादा अचानक लावल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच सर्व कडधान्यांचे भाव सरकारी हमीभावापेक्षा बरेच कमी दरावर टिकलेले आहेत. या जाचक तरतुदींमुळे दालमिल व्यवसाय देखील धोक्यात येईल. त्यामुळे शेतकर्यांचेही खूप नुकसान होईल. केंद्र सरकारने कडधान्यावरील स्टॉक लिमिटचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी असोसिएशनतर्फे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी केली आहे.