जळगाव, प्रतिनिधी । पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात. याकरिता आहाराचे योग्य नियोजन केले तर नक्कीच आजारी पडण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्रा. डॉ.शाल्मी खानापूरकर यांनी दिली आहे.
पावसाळा सुरु झाला आहे. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्याने तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्याने आहाराचे योग्य नियोजन असायला पाहिजे, असे डॉ. शाल्मी खानापूरकर सांगतात. यासाठी आहार घेताना काही पथ्ये पाळली पाहिजेत. आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यात पचनशक्ती कमी असते. त्यामुळे आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा. मीठ आणि आंबट कमी असलेलं जेवण घ्यावं. लोणचे, चटणी, दही, अतितिखट या गोष्टींचा मोह टाळायला हवा. फळभाज्यांवर भर द्यावा (उदा. भोपळा, दुधी, टोमॅटो). आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका या गोष्टी असायला हव्यात. हिरव्या पालेभाज्यांतून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्याने या पालेभाज्या नीट धुवून खाव्यात .
तसेच भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत. जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात. पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे मांसाहारी पदार्थ शक्यतो टाळायला हवी. प्रथिनयुक्त आहारास प्राधान्य द्यावे. (उदा. डाळी, अंडी, मोड आलेली कडधान्ये.)
पावसाळ्यात केसांची निगा ही अधिक महत्त्वाची आहे. या काळात दमटपणा अधिक असल्याने केस तुटण्याचे, गळण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शक्यतो स्ट्रेटनिंग, आयर्न करणे किंवा एखादं जेल लावणे या बाबी टाळाव्यात. केस धुतल्यानंतर ते योग्यरीत्या वाळतील याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे केसांना कोमट खोबरेल तेला लावल्यास होणारी हानी निश्चितच टळू शकते. प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणारे अन्नपदार्थ पावसाळ्यात उपयुक्त असतात. गरम वरण-भातावर पिळलेले लिंबू किंवा मोरावळा तसेच ताजी फळे हे क-जीवनसत्व मिळवून देतात. त्यामुळे प्रतिकार यंत्रणा मजबूत होते. परंपरागत आल्याचा चहा किंवा दुधात सुंठ-हळद घालून घेणे हेदेखील प्रतिकारशक्ती वाढविण्यात उपयुक्त ठरते. न शिजवलेले बाहेरील अन्नपदार्थ टाळल्याने पोटाच्या तक्रारी नक्कीच कमी होतील, अशी माहिती डॉ. शाल्मी खानापूरकर यांनी दिली आहे.