जळगाव, प्रतिनिधी । शहरातील महापालिकेच्यावतीने बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाला आज गुरुवार सकाळी 11 वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरण (पीसीव्ही) सुरु करण्यात आले आहे. गुरूवार, 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जळगाव शहर महानगरपालिका संचलित राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल येथे न्यूमोनिया लसीकरणाच्या सुरूवात प्रसंगी हे लसीकरण महापालिकेतर्फे मोफत केले जाणार असल्याची माहिती महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिली. हे लसीकरण सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध राहणार आहे, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे रूग्णालय उपायुक्त श्री.शाम गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.मनिषा उगले, रूग्णालयाचे व जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
बालकांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या विषाणुंमुळे न्यूमोनिया हा आजार होतो. या आजाराचे प्रमाण पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये जास्त असते. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरु शकते व श्वास घ्यायला लहान मुलांना त्रास होतो. या आजाराची लक्षणे खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे हे आहे. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून शासनाकडून महापालिकेला न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस प्राप्त झाली आहे. ही लस सहा ते 14 आठवड्याच्या बाळासह नऊ महिन्याच्या बालकांना देण्यात येणार आहे. एक वर्षआतील लहान मुलांसाठी ही लस उपयुक्त व आवश्यक असून आरोग्य व बालकल्याण मंत्रालय तसेच पीसीव्हीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीचा पहिला डोस दीड महिन्याच्या किंवा सहा आठवडे वयाच्या बालकांनी, लसीचा दुसरा डोस साडेतीन महिन्याच्या किंवा 14 आठवडे वयाच्या बालकांनी व लसीचा तिसरा डोस 9 महिने वयाच्या बालकांनी घेतलाच पाहिजे. सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे लसीकरण मोफत असून शासनाच्या सर्व आरोग्य केंद्रांवर न्यूमोनिया लस उपलब्ध आहे. न्यूमोनिया प्रतिबंधक एका लसीचे बाजारमूल्य सुमारे चार हजार रुपये असून सर्वसामान्य नागरिकांना हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जागतिक आरोग्य संघटना व तज्ज्ञांच्या मते कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकेदायक असून त्यापासून लहान मुलाचे संरक्षण करण्याकरिता शासनाद्वारे केले जाणारे हे लसीकरण नागरिकांकरिता महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे ही लस मोफत उपलब्ध असून शहरातील अधिकाधिक नागरिक माता-भगिनींनी या सेवेचा लाभ घेऊन एक वर्षाआतील बालकांचे लसीकरण करवून घेण्याचे आवाहन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी यावेळी केले.