जळगाव – गेल्या एक वर्षापासूनचा कोरोनाचा कालखंड ,त्यामुळे सुरू झालेले ऑनलाईन शिक्षण. ऑनलाईन शिक्षणाचा पहिलाच अनुभव असल्यामुळे विद्यार्थी – पालक गोंधळलेल्या अवस्थेत असताना, पालकांना विश्वासात घेऊन आणि विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून शाळेने ऑनलाईन शिक्षणाचे यशस्वीरित्या पेललेले आव्हान आणि विविध क्रिया – कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम शाळेने केलेले आहे.
ऑनलाईन समर कँप, ऑनलाईन उद्योग – व्यवसायाभिमुख मार्गदर्शन वर्ग, भाषा, विज्ञान, गणित, कला, नाट्य यांचे ऑनलाईन क्रिया – कौशल्याचे वर्ग यातून ऑनलाईन शिक्षणाचा नवा अध्याय गाठण्यात शाळा यशस्वी झालेली आहे. शालेय परिपाठाच्या ( Assembly ) च्या माध्यमातून मुलांच्या विविध सुप्तगुणांना वाव देऊन, पालक परिसंवाद, माजी विद्यार्थी मार्गदर्शन, मान्यवरांची मुलाखत, योगा वर्ग, प्रार्थना वर्ग, गायन, संगीत, नाट्य, नृत्य या माध्यमातून मुलांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि सक्षम बनविण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे.
कोरोनाचा काळ आणि शाळा बंद हा पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अस्थिर करणारा काळ; अशा गोंधळलेल्या परिस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना भावनिक आधार देऊन, समुपदेशन, मार्गदर्शनाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याचे काम शाळा करत आहे. आज देशभरातील विविध राज्यातील मुला – मुलींनी शाळेमध्ये प्रवेश घेतला असून, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा नेहमीच कठीबद्ध आहे.
१०० एकरामध्ये वसलेला शाळेचा हा परिसर गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांविना मुका आणि सुना सुना झाला आहे. झाडे, वेली, पशु, पक्षी शाळेत बागडनाऱ्या छोट्या संवंगड्याच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत. नि:शब्द झालेले वर्ग आणि सगळं काही असताना चिमुकल्यांविना भकास वाटणारे शाळेचं हे खेळाचे मैदान.
मुलांना खेळताना – बागडताना , हातात – हात घालून हसताना, गप्पा मारताना बघण्याची ओढ शिक्षकवृंद, कर्मचारी इथल्या सर्वांनाच लागलेली आहे. आज यशस्वी वाटचालीतील शाळेचा १४ वा स्थापना दिन साजरा होत आहे; याचा सर्वांनाच आनंद आणि अभिमान आहे. आजवरच्या शाळेच्या प्रगतीशील वाटचालीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.
कोरोनाचा हा कठीण काळ संपून, पुन्हा नव्याने सर्व काही सुरळीत आणि चांगले होऊन आपण पुन्हा सर्वजण एकत्र येऊ, हा विश्वास आपण सर्वांनी जपूया. विश्वाच्या कोरोना मुक्तीची आणि विश्व कल्याणाची आज आपण शाळेच्या स्थापना दिनी प्रार्थना करूया.
भाऊंच्या आचार- विचार व मार्गदर्शनाचा वारसा शाळेच्या संचालिका निशाजी जैन आणि प्राचार्य मनोज परमार यशस्वीरित्या पुढे चालवत आहेत. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली शाळा प्रगतीच्या उंबरठ्यावर असून,शाळेची निरंतर यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रत्यक्ष कृतीवर आधारित, भविष्याशी निगडीत नैतिक मुल्ये देणारी शिक्षणपद्धती अवलंबन्यासाठी शाळा नेहमीच कटीबद्ध आणि तत्पर आहे.
लेखन
परशुराम माळी
शिक्षक
अनुभूती स्कूल, जळगाव.