IPLमधील शनिवारचा (३१ ऑक्टो.) दिवस हा दोन बलाढ्य संघांना धक्का देणारा ठरला. दुपारच्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेल्या आणि प्ले-ऑफ्समध्ये पात्र ठरलेल्या मुंबईने दिल्लीच्या संघाला ३४ चेंडू राखून पराभूत केलं. तर बंगळुरूच्या संघाला हैदराबादने ३५ चेंडू राखून पराभूत केलं. त्यामुळे आता दोन्ही संघ साधारणत: सारख्याच नेट रन रेटवर असून त्यांच्यासाठी ‘प्ले-ऑफ्स’चं गणित अधिकच अवघड झालं आहे.
हैदराबाद विरूद्धचा पराभव हा बंगळुरूचा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. या सामन्याआधी दिल्लीला मुंबईविरोधात पराभव स्वीकारावा लागला. आता दिल्ली आणि बंगळुरू या दोन्ही संघाचे १३ सामन्यांत १४ गुण असून त्यांचा साखळी फेरीतील १ सामना शिल्लक आहे. दुर्दैवाने त्यांचा शिल्लक राहिलेला सामना हा एकमेकांविरोधातच आहे. त्यामुळे सोमवारच्या सामन्यात जो संघ विजेता ठरेल, तो संघ १६ गुणांसह ‘प्ले-ऑफ्स’चं तिकीट मिळवेल.
पंजाब, राजस्थान, कोलकाताचं काय?
रविवारचे २ सामने हे चेन्नई वि. पंजाब आणि कोलकाता वि. राजस्थान असे आहेत. यापैकी पंजाबने सामना जिंकला तर त्यांचं आव्हान कायम राहिल. पण चेन्नईने सामना जिंकला तर पंजाबला गाशा गुंडाळावा लागेल. दुसरीकडे राजस्थान आणि कोलकाता यांच्यात जो विजेता ठरेल, त्याचे १४ गुण होतील. तर पराभूत संघाचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात येईल. तसेच मंगळवारी होणारा शेवटचा साखळी सामना हा हैदराबाद आणि मुंबई यांच्यात आहे. यात मुंबई पराभूत झाली तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही, पण हैदराबादचा विजय त्यांना प्ले-ऑफ्सच्या तिकीट देईल आणि दुसऱ्या एका संघाला स्पर्धेबाहेर व्हावं लागेल.