मुंबई – अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलिसांना बदनामी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होणाऱ्या रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचं दिसून येत आहे. सोबतच मराठी भाषा आणि मराठी भाषिक व्यक्तींवरदेखील टीका करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या या प्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात अलिकडेच अभिनेता सोनू सूदच्या नावाने फेसबुक, ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करुन नागरिकांकडून पैसे उकळ्याचा प्रकार समोर आला होता.