जळगाव – केंद्र सरकारच्या कडधान्याबाबत आकस्मित स्टॉक लिमिट लावण्याच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार सोमवारी, 5 जुलै रोजी बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी दिली.
केंद्र सरकारने कडधान्यांवरील स्टॉक मर्यादा अचानक लावल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे कडधान्य पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच सर्व कडधान्यांचे भाव सरकारी हमीभावापेक्षा बर्याच कमी दरावर टिकलेले आहे. या जाचक तरतुदीमुळे दालमिल व्यवसाय धोक्यात येईल.
त्यामुळे शेतकर्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. परिणामी धान्याची बिजवाई, पेरणी कमी होऊन भविष्यात कडधान्यांच्या भाववाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कडधान्याबाबत आकस्मित स्टॉक लिमिट लावण्याच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार सोमवारी बंद राहील. केंद्र सरकारने कडधान्य स्टॉक लिमिटचे धोरण मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष कल्पेश संघवी, ईश्वर कोठारी, मधुकर येवले, सचिव यतिन कोठारी, सहसचिव नरेंद्र लढ्ढा, जितेंद्र बोथरा, अतुल अग्रवाल (रावेर), हितेश नेमाडे (सावदा), राहुल गुजराथी (फैजपूर), अशोक चौधरी (यावल), भरत शेंडे (पाचोरा), अल्केश ललवाणी (जामनेर), विशाल करवा (धरणगाव), संदीप जाखेटे (एरंडोल), दिलीप मंत्री (कासोदा) यांनी दिला आहे. दरम्यान, या स्वरुपाचे आंदोलन सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
धान्य बाजारावर होणार परिणाम
केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्यामुळे व आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्याच्या व्यापार्यांमध्ये रोष आहे. केंद्र सरकारने 2 जुलै रोजी परिपत्रक काढून डाळींच्या साठवणुकीवर तत्काळ स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार होलसेल व्यापारी 200 टन अर्थात दोन हजार क्विंटल डाळींचा स्टॉक ठेऊ शकेल. चिल्लर परवान्यासाठी पाच टन अर्थात 50 क्विंटल डाळींची मर्यादा निर्धारित केली आहे. दाल मिलर्सला ही मर्यादा तीन महिन्यांचे उत्पादन किंवा वार्षिक क्षमतेच्या 25 टक्के, यापैकी जी जास्त राहील, ती असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी मर्यादित स्टॉक ठेवतील. मात्र, शेतकर्यांच्या डाळ उत्पादनाची विक्री मंदावेल आणि त्यांचेही नुकसान होईल. तर आयात खुली केल्याने व्यापारी व शेतकर्यांवर दुहेरी संकट येईल, असे मत जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी व्यक्त केले.