चाळीसगाव – कोविड १९ या महामारीत गेल्या वर्षभरापासून ते आजपर्यंत सातत्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांना रात्र दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या आदेशानुसार त्यांना कर्तव्यावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हा प्रकार म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” याप्रमाणे वापरून फेकून देण्यासारखा आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत रात्रंदिवस काम केले अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे माणुसकीला धरून नाही हे कर्मचारी गेल्या वर्षभरात कुशल झाले असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिथे शक्य असेल तिथे त्यांना आरोग्य विभागाच्या इतर योजनांमध्ये समावेश करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा या कर्मचाऱ्यांसोबत मलाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
आज जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कोविड हंगामी, रोजंदारी कर्मचारी अर्थात हे सर्व कोरोना योद्धे यांना अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने हे सर्व 45 कर्मचारी आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांना दिले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, डॉ. अर्चना पाटील आरोग्य संचालक यांना दूरध्वनीवर संपर्क करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे मांडले. खासदार पुढे म्हणाले की नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनी या कंत्राटी कामगारांचा सारासार विचार करत यांना वेगवेगळे योजनेमध्ये समावून घेण्यात संदर्भामध्ये आदेश दिला असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या कर्मचाऱ्याना कार्यमुक्त करुन अन्याय केला जात आहे.
रात्रंदिवस सेवा करणारे कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या मानवी अधिकाराचे संरक्षण करत त्यांना वेगवेगळ्या आयुष्यमान भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच आरोग्य इतर विभागात समावेश करून घ्यावा अशी विनंती वजा सूचना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे. यावेळी कंत्राटी कामगारांनी आपले म्हणणे मांडले अनेक महिला कर्मचारी यांना यावेळी रडू कोसळले होते.