जळगाव – ज्येष्ठ समाजसेवक, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सभापती, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बळीरामदादा तोताराम सोनवणे यांचे दि. 25 जून 2021 रोजी दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने जळगाव जिल्हा व जळगाव महानगर शिवसेनेतर्फे शुक्रवार, दि. 2 जुलै 2021 रोजी दुपारी दीडच्या सुमारास कांताई सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की पितृतुल्य स्व.बळीरामदादा सोनवणे यांना तमाम जळगावकरांच्या वतीने मी महापौर या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही वयाच्या 84 व्या वर्षापर्यंत शिदोरी जोपासणारे आदरणीय दादा त्यांच्या काळातील निष्णात पहिलवान होते. कुटुंबवत्सल दादा शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्याची सुरूवात म्हणजे त्यांनी आपल्या परिवारात अनेक डॉक्टर घडविले. त्यांना सामाजिक समरसतेची संपूर्णपणे जाणीव होती आणि ती समाजासाठी मुख्य प्रवाहात नियमित आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न कायम राहिले. म्हणूनच समाज त्यांच्या शब्दाला प्रमाण मानत असे. तोच वारसा आज शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे, आमदार सौ.लताताई, माजी महापौर सौ.राखीताई व संपूर्ण सोनवणे कुटुंबीय पुढे नेत वाटचाल करीत आहेत. राजकारणात आदरणीय दादांनी अनेक पदे भूषविली. प्रत्येक पद त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्यापर्यंत चालून आले. पदासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. दादा अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे निष्ठावान म्हणून राहिले. सोनवणे परिवाराने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मात्र, खंबीर दादांमुळे ते कधीही डगमगले नाहीत. दादांच्या पश्चात त्यांचे पुत्र प्रा.चंद्रकांतजी, श्यामकांतजी, नरेशजी, डॉ.किरणजी व संपूर्ण कुटुंबीयांना तोच वारसा जपण्यासाठी बळ मिळो, हीच मी इश्वरचरणी प्रार्थना करते. बळीरामदादांची पावन स्मृती आपल्यात सदैव कायम राहो, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. ओम शांती..!
यावेळी पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील, खासदार श्री.उन्मेष पाटील, आमदार श्री.चिमणराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ.रोहिणी खडसे-खेवलकर, जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख (जळगाव ग्रामीण-शहर, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे, माजी मंत्री श्री.गुलाबराव देवकर, डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.शांताराम सोनवणे, अब्दुल करीम सालार, डॉ.राधेश्याम चौधरी, श्री.प्रवीण पगारिया, श्री.अनिल अडकमोल, श्रीमती प्रतिभा शिंदे, अॅड.जमील देशपांडे, श्री.भरत अमळकर, श्री.संजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, शिवसेनेचे रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे, महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ.महानंदा पाटील, महानगरप्रमुख सौ.शोभा चौधरी, महापालिकेतील भाजपचे गटनेते श्री.भगत बालाणी, माजी महापौर डॉ.अश्विन सोनवणे, प्रा.डी.डी. बच्छाव यांच्यासह जिल्हा व शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांतील मान्यवर उपस्थित होते. श्री.शंभू पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


