जळगाव – कोरोना महामारी सुरु आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया आणि रक्ताच्या इतर आजारांशी निगडीत रुग्णांना रक्त मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच शहरातील हाउसिंग सोसायटी आदींनी संपर्क करून ऐच्छिक रक्तदान कॅम्प आयोजित करावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
ऐच्छिक रक्तदान शिबिरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठविले आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स दिवसानिमित्त गुरुवारी १ जुलै रोजी राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई संलग्नित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्त व रक्त घटक केंद्रातर्फे खुले रक्तदान शिबीर ब्लड बँकेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, विकृती शास्त्र विभागाच्या प्रमुख शैला पुराणिक, ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. उमेश कोल्हे, डॉ. आकाश चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला फित कापून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यानंतर डॉ. विजय गायकवाड यांच्यापासून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. यामध्ये महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कारागृह प्रशासनाचे अधीक्षक अनिल वांढेकर, जितेंद्र माळी आदी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. शिबिरात एकूण 30 जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. संदीप पटेल उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी निलेश पवार, रोहिणी देवकर, राजेश कुलकर्णी, अरुण चौधरी, पंकज चौधरी, संगीता वंजारी, भरत महाले, राजेश शिरसाठ, सुनील पवार, मोहम्मद रफतेखाल, अजित पाटील आदींनी परिश्रम घेतले.