जळगाव, प्रतिनिधी । लग्नाच्या बेडीत अडकवून तरुणाची दीड लाखात फसवणूक झाल्याची घटना २० जून रोजी घडली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील रावेर तालुक्यातील खिरोदा येथील रहिवाशी मिलिंद इंगळे (वय ३४) या तरुणाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. ७ आरोपींपैकी टाटानगर गोवंडीची रहिवाशी नाजनीन जान मोहम्मद खान या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. लालचंद ओंकार म्हसकर (रा .पिंप्राळा जामठी, ता -सोयगाव, जि – औरंगाबाद), विशाल पाटील नवरीची चुलत बहीण, अंकुश खडसे, हर्षल पाटील, लताबाई अशी या आरोपींची नावे असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.२० जून रोजी या सर्व आरोपींनी फिर्यादीच्या लग्नाचा बनाव करून त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयात लुबाडले आहे. अमरावती शहराजवळच्या बडनेरा बायपास मार्गाजवळ हा लग्नाचा बनाव करण्यात आला होता. २८ जून रोजी या गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली. या आरोपींविरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.