मुंबई वृत्तसंस्था – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु शनिवारी अनिल देशमुख यांनी अजून वेळ मागून घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांनी ईडीच्या कार्यालयाला पत्र लिहित जबाब हा व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून नोंदवण्याच यावा अशी विनंती केली. यावरून सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची तयारी
प्रत्यक्ष चौकशीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असं ईडीनं अनिल देशमुख यांना म्हटलं आहे.
दरम्यान, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझे वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली होती.
“तुमची प्रतीमा स्वच्छ आहे, तुम्ही काही केलं नाही तर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला माहितीये तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय. सध्या माध्यमांमधून जे समोर आलं जी आकडेवारी समोर आली, झोन १ ते झोन ७ नं इतकं कलेक्शन केलं, झोन ८ ते झोन १२ ने इतकं कलेक्शन केलं, ते ऐकून राग येतो. मग कोरोना तुम्हाला आता आठवला, ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला तेव्हा कोरोना नाही का आठवला, असं म्हणावंस वाटतं,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“ED नं बिलकुल अपवाद करू नये. कायदा हा सर्वांसाठी समानत आहे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? भाजपची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं दमानिया म्हणाल्या.