जळगाव, प्रतिनिधी । आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समांतर रस्ता कृती समितीचे सदस्य, जळगावकर नागरिक, महापौर यांच्यासमवेत ‘NHAI’चे अधिकारी, कन्सल्टंट या सर्वांची समन्वय बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जळगाव शहरातून जाणारा पावणे आठ किलोमीटरचा रस्ता, त्याचा दर्जा, ‘NHAI’करीत असलेली कामे, विशेषत: अग्रवाल हॉस्पिटल समोरील अंडरपास हा सद्य:परिस्थितीत सहा मीटरचा असून तो 12 मीटरचा करावा, या संदर्भात समितीच्या वतीने संपूर्ण तांत्रिक माहिती आर्कि. शिरीष बर्वे यांनी दिली.
आजच्या या समन्वय बैठकीत ‘NHAI’तर्फे होत असलेले काम व त्याच्या दर्जावर सर्वांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यामध्ये नैसर्गिक पाणी वाहण्याचे नाले बंद केल्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात होणारी नुकसानी, दुतर्फा होत असलेले अतिक्रमण, एम.एस.ई.बी.च्या केबल व चुकीच्या ठिकाणी लागलेले इलेक्ट्रीक खांब, अग्रवाल हॉस्पिटल समोरील चौकातून सुमारे तीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे दिवसभरातून चार वेळेला होणारे आवागमन त्यामुळे रहदारीची होणारी कुंचबणा, अपघात, या सर्व विषयासंदर्भात महापौर सौ.जयश्री महाजन, समितीचे सदस्य आर्कि. शिरीष बर्वे, नगरसेवक अनंत (बंटी) जोशी, डॉ.राधेश्याम चौधरी, अॅड.जमील देशपांडे, सुशील नवाल, ललित धांडे यांनी बैठकीत सविस्तर समस्या मांडल्या.
एप्रिल महिन्यामध्ये महापौरांनी ‘NHAI’ला दिलेले नैसर्गिक नाले संदर्भातील पत्र व त्यावर आजतागायत कोणतीही कृती न झाल्याने महापौरांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसेच होणार्या नुकसानीकरिता ‘NHAI’ जबाबदार राहील असे विशेषत: यावेळी त्यांनी नमूद केले. बैठकीत ‘NHAI’चे प्रोजेक्ट डायरेक्टर सी.एम.सिन्हा, कन्सल्टंट त्रिवेदी व इतर इंजिनिअर्स ही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत यांनी या प्रोजेक्ट संदर्भातील सर्व टेक्निकल ड्राईंग्स, ‘NHAI’करीत असलेली कामे व त्याविषयीची सविस्तर माहिती ‘NHAI’च्या अधिकार्यांनी समांतर रस्ता कृती समितीचे सदस्य आर्कि.शिरीष बर्वे व जिल्हाधिकारी दोघांना येत्या दोन दिवसात देण्याचे आदेश केले. तसेच या आठवड्यात जळगाव महानगरपालिका सिटी इंजिनिअर, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक, समांतर कृती समितीचे सदस्य, महापौर व संबंधित सर्वांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन अहवाल देण्याचे आदेश ‘NHAI’चे सी.एम.सिन्हा यांना दिले. ‘नागरिकांच्या हिताच्याच दृष्टीकोनातूनच काम झाले पाहिजे’ अशी स्पष्ट ताकीद वजा सूचना जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत यांनी यावेळी अधिकार्यांना दिली. बैठकीत शिवकॉलनी व इकरा शाळेजवळ पादचारी अंडरपास होणार असल्याचे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.