जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. तर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नागरिकांना तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी राहावी यासाठी प्रामुख्याने “त्रिसूत्री”चे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी २२ जून रोजी प्रसार माध्यमांद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाचे कार्यासन अधिकारी व संचालकांनी पत्र देऊन नागरिकांना लोकडाऊन संपल्यानंतर कोरोना प्रतिबंधनासाठी करायच्या प्रभावी योग्य वर्तनाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्कचा योग्य वापर करणे, शारीरिक अंतर ठेवणे, हात वेळोवेळी धुणे या त्रिसूत्रीचा कायम अंमल करावा, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे तिसरी लाट आली तरीही त्याची तीव्रता कमी प्रमाणात राहील, असे म्हटले आहे.
यासोबत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. त्यामध्ये मास्कचा योग्य वापर करणे, शारीरिक आंतर राखणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवणे, वारंवार साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुणे, हात न धुता डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करु नये यासह घरातील हवा खेळती ठेवणे महत्वाचे आहे. शहरात कामानिमित्त जाताना गर्दी टाळावी. स्वतःची सुरक्षा पाळावी. खोकला आल्यास कोपरातून हात वाकविणे किवा टिश्यू पेपर, रुमालचा वापर करणे. खोकताना किंवा शिकताना तुषारबिंदू दुस-या व्यक्तीवर पडू नये म्हणून काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
गरजेचे असेल त्यावेळी प्रत्यक्षात भेटताना दोन व्यक्तींमधील अंतर किमान सहा फुटाचे असावे. मास्क घातल्याशिवाय अजिबात कोणालाही भेटू नये. मित्र, पाहुणे किंवा नातेवाईक घरी आल्यास मुख्यत्वेकरून बाहेर मोकळ्या जागेत व खुल्या हवेत भेटावे. शक्यतो आभासी भेट (ऑनलाईन) घ्यावी. तंबाख, गुटखा, खर्रा आदी अमली पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कोणत्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियाद्वारे नकारात्मक गोष्टी पाठवू नका. अधिकृत वेबसाईटवरून कोरोना बाबतची माहिती घ्यावी. कोणी आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती काळजी किंवा चिंता करीत असेल तर त्यांचे समुपदेशन करावे. कोविड विषयक शंका असल्यास जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.