जळगाव, प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्र. 2 अर्थात शिवाजीनगर परिसरात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते आज मंगळवार सकाळी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, नगरसेविका कांचन सोनवणे, गायत्री शिंदे यांच्यासह महापालिका अभियंता चंद्रकांत सोनगिरी, महापालिका कर्मचारी प्रकाश सोनवणे, शांताराम सोनवणे तसेच समाजसेविका ज्योत्स्ना दारकुंडे, समाजसेवक निलेश तायडे, मनोज सोनवणे, भगवान सोनवणे, गोपी गोसावी, मनोज आटवाल, विजय राठोड, उत्तम शिंदे, रवी पाटील, कौशल भोसले व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांना रस्त्यांच्या अवस्थेने कमालीचे हैराण केले होते. त्याची गंभीरतेने दखल घेऊन प्रभागातील नगरसेवक, नगरसेविकांनी महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने रस्त्यांच्या कामांसंदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर आज सकाळी या परिसरातील काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे पाहावयास मिळाले.