जळगाव – ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्यावतीने आंदोलनाचा निर्णय समता परिषदेच्या युवक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने घेण्यात आला आहे. शहरातील आकाशवाणी चौकात दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व ओबीसी संघटनांना बरोबर घेऊन आंदोलनात्मक भुमिका घेण्यात आली असून राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगरपंचायती व २४१ नगरपालिकामधल्या ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहेत.
३४ जिल्हापरिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागांपैकी १०२९ जागा कमी होणार आहेत २७७८२ ग्रामपंचायतमध्ये अंदाजे १,९०,६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ओबीसी संवर्गातील कमी होत आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे, सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनासंबंधी तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यात सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या कार्यकत्यांनी एकत्र यावे व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी केले आहे.