जळगाव – उत्क्रांतीच्या टप्प्यावर पुरुषाचा मेंदू हा स्रीच्या मेंदू पेक्षा 11 टक्क्यांनी मोठा असला तरी सूक्ष्म विचार करणे, निर्णय घेणे, तर्क करणे, संशोधन करणे अशाबाबतीत स्त्रीचा मेंदू हा, अकरा टक्क्याने पुरुषाच्या मेंदू पेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे स्त्रियांचा मेंदू अधिक परिपक्व असून, सूक्ष्म हालचालींचा अर्थ लावण्याची क्षमता स्त्रियांमध्ये अधिक असते. म्हणून स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत तसूभरही कमी नाही ,तिनेही स्वतःला कमी लेखू नये, असा अभ्यासपूर्ण सल्ला डॉ. राणी बंग यांनी दिला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग व सोशल मिडिया विभाग यांच्यामार्फत , गुंफू हातांमध्ये हात ,फुलू सारे एक साथ, या मुख्य विषयाला अनुसरून तीन दिवसांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मुख्य विषयाला अनुसरून, काय बाय सांगू, कस ग सांगू , या विषयावर पहिले पुष्प गुंफताना डॉ.राणी बंग म्हणाल्या की, लहानपणी मुलींपेक्षा मुलांच्या आहाराकडे, त्यांच्या खेळण्या बागडण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. त्याबाबत मुलांना पुरेसे स्वातंत्र्य दिले जाते. मात्र मुलींना याबाबतीत कोवळ्या वयातच शारीरिक-मानसिक बंधनात अडकवून ठेवले जाते. यामुळे त्यांच्या क्षमतांचा विकास होत नाही आणि म्हणून स्रीयांवर दुर्बलतेचा, अपरिपक्वतेचा ठपका ठेवला जातो. पण जर लहानपणीच मुलगी, मुलगा असा भेद न करता दोघांनाही पोषक आहार, विहार जाणीवपूर्वक दिला गेला तर, सुदृढ बालपणातून सक्षम नागरिक आणि उत्तम व्यक्ती समाजात निर्माण होतील.
आज अनेक क्षेत्रात महिला संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्या स्वतःचा तसेच त्या क्षेत्राचा वैशिष्टपूर्ण विकास साधत आहेत. मुल न होण्यात 75 टक्के पुरुषांचा दोष असूनही, मूल न होणे किंवा मुलगा न होणे यात स्रीलाच जबाबदार धरुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो.
खरं तर, गर्भात एकदा फलनक्रिया झाली की कुणीही गर्भाचे लिंग बदलू शकत नाही,हे शास्त्रीय सत्य आपण स्विकारलेच पाहिजे. बुवा-बाबांच्या नादी लागू नये, असे ही त्यांनी निक्षून सांगितले.
आज समाजात मुलांपेक्षा मुलीच आई-वडिलांचा सांभाळ अधिक चांगल्या प्रकारे व मोठ्या संख्येने करताना दिसतात. माझ्या वडिलांनी जिवंतपणीच माझ्या भावांना सांगून ठेवल्या नुसार, मी स्वतः माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले, असे नम्रतापूर्वक आणि स्वाभिमानाने डॉ. बंग यांनी सांगितले .म्हणून वंशाचा दिवा म्हणजे मुलगा हवा, या अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कुटुंब नियोजनात 85% शस्त्रक्रिया या महिलांच्या तर केवळ 15 टक्के शस्त्रक्रिया या पुरुषांच्या होतात. वास्तविक पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया कमी वेळेची व कमी त्रासाची असते. पण तरीसुद्धा ती स्त्रीवरच लादली जाते. कुटुंब नियोजनात गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, तांबी वापरणे याबाबतीतही स्त्रियांमध्ये प्रचंड अज्ञान आणि गैरसमज आहेत .चुकीच्या पद्धतीने गोळ्यांचे सेवन करणे, साधनांचा वापर करणे, यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
स्त्रियांच्या मासिक पाळी बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, पुरुषाला जर दाढी – मिशांचा पुरुषी स्वाभिमान आहे तर, मासिक पाळी नंतर नवीन जीव जन्माला घालण्याची क्षमता केवळ स्रीमध्येच असते, याचा स्रीला सार्थ अभिमान वाटला पाहिजे .म्हणून मासिक पाळीला विटाळ, अमंगल, अपवित्र संबोधनने साफ चूक आहे. स्वतःला मासिक पाळी असतानाही मी अनेक वेळा देवळात गेल्याचे त्यांनी अगदी ठामपणे आणि मन मोकळेपणाने सांगितले. वैद्यकीय सल्ल्याशिवाय पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणे, मासिक पाळीत कमी अधिक रक्तस्राव जाणे, मासिक पाळीत केस धुणे ,गर्भधारणा असताना लैंगिक संबंध कधी ,केव्हा, कसे ठेवावे ,पतीपत्नीचा लैंगिक संबंध याचा नेमका अर्थ म्हणजे दोघांनाही आनंद मिळणे याबाबत त्यांनी समर्पक उदाहरणे देऊन, मार्गदर्शन केले .
नववधूची कौमार्य चाचणी ही अत्यंत विकृत, किळसवाणी आणि मानहानीकारक प्रथा आपल्या समाजात आज ही रूढ आहे. तिला आपण विरोध केला पाहिजे. नीतीचे नियम स्त्रीपुरुष दोघांसाठी सारखे असले पाहिजेत.
खरंतर, योनी पटल फाटण्याची अनेक कारणे असतात.जसे सायकल चालवणे, उंच उडी मारणे, झाडावर चढणे यामुळेही योनी पटल फाटू शकते, असे त्यांनी सांगितले.
आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे,याबद्दल त्यांनी खेद व चिंता व्यक्त केली.
व्यसनाचा सर्वात मोठा धोका म्हणजे प्रजनन क्षमता कमी होणे, अवेळी गर्भपात होणे, मेंदू बधीर होणे ,मासिक पाळी वर विपरीत परिणाम होणे अशा अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध कसे असावेत, यावरही त्यांनी आडपडदा न ठेवता मार्गदर्शन केले. स्त्रियांचा आहार- विहार योग्य असण्याबरोबरच, समलैंगिकता, जन्मकुंडलीचे थोतांड, गुप्तरोग, जास्त मुली होण्याचा दोष देवाला देणे, गरोदरपणात पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यांचे दुष्परिणाम याबाबतही त्यांनी अनुभवजन्य विवेचन केले.
शेवटी त्या म्हणाल्या की, स्रीचा जन्मा हा सर्व सहन करण्यासाठी आहे, असे असे मानणे, हे आपल्याकडे सर्वात मोठे सामाजिक प्रदूषण असून ,कुटुंबासाठी सर्वार्थाने स्त्री सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शंकांचे योग्यप्रकारे निरसन होईपर्यंत स्त्रियांनी प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारण्यासाठी लाजू नये. त्यासाठी असलेली चुप्पी तोडली पाहिजे.
श्रोत्यांच्या निवडक प्रश्नांना त्यांनी समर्पक , सोप्या भाषेत उत्तरे दिली .
व्याख्यानात पाचशेहून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. त्यात महिला श्रोत्यांचे प्रमाण अधिक होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सविता शेटे ,बीड, पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत निमा शिंगारे, नवी मुंबई,सूत्रसंचालन कल्पना बोंबे,ठाणे, प्रश्न वाचन जयश्री चव्हाण ,नंदुरबार तर आभार प्रदर्शन नलिनी शेरकुरे,नागपूर यांनी केले .