जळगाव- जळगावातील शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रात, आपल्या सामाजिक दायित्वाचे भान राखून सदैव जातीय सलोखा सामाजिक एकोपा कायम राखण्यात मोलाचे योगदान देणारे हाजी गफ्फार मलिक यांना जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे मरणोत्तर ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्यासंदर्भातील सुतोवाच महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आज केले. जळगाव रत्न पुरस्कार देण्यासंदर्भातील हा प्रस्ताव येत्या महासभेत मंजूर करण्यात येणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
“हाजी गफ्फारभाई मलिक यांना मरणोत्तर ‘जळगाव रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी अनेक संस्थांनी महानगरपालिकेकडे विषय नोंदविला होता. गफ्फार मलिक यांचे मुस्लिम समाजामध्ये शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव योगदान, जळगाव शहरात व जिल्ह्यात सामाजिक सलोखा, सर्वधर्मीय, सण-उत्सव हे साजरा होत असताना मुस्लिम समाजाचा सहभाग, अशा अनेक कारणांसाठी आदरणीय गफ्फारभाई हे या पुरस्काराचे नुसते मानकरी नसून, या पुरस्काराची त्यांच्यामुळे गरिमा वाढणार आहे, असे मला प्रत्यक्षात वाटते आणि म्हणूनच या सर्व मागणीचा विचार करून महासभेसमोर हा विषय मांडून सर्वानुमते ‘जळगाव रत्न’ हा पुरस्कार त्यांना लवकरच जाहीर होईल, ही फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे आणि हीच खरी जळगावकरांची त्यांना आदरांजली ठरेल”, असेही महापौर म्हणाल्यात.
जळगाव महानगरपालिका सामाजिक दायित्वाची भान राखून आपले योगदान देताना, सामाजिक एकोपा सातत्याने जपण्याचे कार्य करणाऱ्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आलेला आहे. याशिवाय केशव स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाशजी आचार्य (मरणोत्तर) व विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्वलजी निकम यांनासुद्धा ‘जळगाव रत्न’ पुरस्कार यापूर्वीच जाहीर झालेला असताना, आता त्याच अनुषंगाने जळगाव शहरातील सामाजिक एकोपा टिकून ठेवण्यासाठी तसेच मुस्लिम समाजासाठी समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षित बनवण्यासाठी इकरा एज्युकेशन संस्था व अँग्लो उर्दू शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सतत कृतिशीलता दाखवणारे व हिंदू मुस्लिम समाजातील विविध सामाजिक उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून खारीचा वाटा म्हणून सदैव कार्यतत्पर असल्याचे कार्य हाजी गफ्फार मलिक हे करीत होते. जरी ते राजकारणी होते तरी त्यांनी सामाजिक कार्य जोपासताना कुठेही राजकीय झळ लागू दिली नाही.
आपल्या कृतीमुळे कोणताही समाज दुखावला जाणार नाही याचीही त्यांनी आपल्या जीवन प्रवासात प्रकर्षाने काळजी घेतली. या सर्व बाबींची दखल घेऊन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ‘जळगाव रत्न’ हा पुरस्कार हाजी गफ्फार मलिक यांना दिला जाईल व या संदर्भात प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवून आगामी काळात तो प्रदानही केला जाईल, अशी माहिती महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिली.