जळगाव – आपल्या पत्नी सोबतच्या शरीर संबंधांचे चित्रीकरण करून छळ करणार्या पतीच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुरुदत्त कॉलनीत राहणाऱ्या युवकाची मॅट्रीमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून त्या युवतीशी ओळख झाली होती. ती बँकेत नोकरी तर तो खासगी क्लासेस चालवतो. जून महिन्यात दोघांचा विवाह झाला. लग्नानंतरच्या पती हा दोघांच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ तयार करीत होता.
नकार दिल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचा. व्हिडिओ त्याने लॅपटॉपमध्ये ठेवलेले आहेत. हा प्रकार सासूला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मुलगा सांगतो तसे कर, असे त्यांनी सांगितले. मोबाइलही हिसकावून घेण्यात आला. तो संशयी वृत्तीचा असल्याने पाळत ठेवत होता. कर्ज फेडण्याच्या उद्देशाने नोकरदार मुलीशी लग्न केल्याचे सासरचे म्हणत होते. त्याला असलेला आजारही लपवण्यात आला. तो बऱ्याच वेळा घरातून निघून जायचा.
सासरच्या मंडळींनी ५० तोळे सोने व हुंड्याच्या मागणीसाठी छळ केल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे. या प्रकरणी त्यांनी महिला दक्षता समितीकडे अर्जही केलेला आहे. अखेर त्या विवाहितेने जळगावातील रामानंद नगर पोलिस ठाणे गाठून गुरुवारी पती, सासू, सासरे व नणंदच्या विरोधात फिर्याद दिली.
त्यावरुन रात्री उशीरा सासरच्या मंडळीविरुध्द भादंवि कलम ४९८ व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ५० ताेळे साेने, हुंड्यासाठीही सासरच्यांकडून छळ हाेत असल्याचे तिने नमूद केले आहे.