जळगाव – वेगवेगळ्या कारणांमुळे कुटूंबापासून दुरावलेल्या, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा पोलिस दलातर्फे ऑपरेशन मुस्कान-१० ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
मोहिमेत १ ते ३१ जून दरम्यान जिल्ह्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच सापडलेल्या बालकांची माहिती, फोटो संकलित करुन ती www.trackthemissingchild.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी किंवा वस्तू विक्री करणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, रुग्णालय, हॉटेल, दुकान आदी ठिकाणी काम करणारी मुले यांना हरवलेली मुले समजून त्यांची माहिती, फोटो अपडेट केली जाणार आहे. सापडलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडील, कायदेशीर पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. या माहिमेस सहकार्य करु इच्छिणाऱ्या संस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक, दादाभाऊ पाटील, गायत्री सोनवणे व केशवस्मृती प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पांतर्गत ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहीमेमुळे अनेक हरवलेल्या बालकांना पुन्हा पालकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी या मोहीमेचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.