नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांत आणि पीएसयुमध्ये काम करणाऱ्या जवळपास 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यामुळे त्यांच्या कमीतकमी वेतनात वाढ होणार आहे.
श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, सरकारने केंद्र सरकार, रेल्वे, खाणी, पेट्रोलियम क्षेत्र, मुख्य बंदरे आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही मंडळामध्ये (PSU) काम करणाऱ्या कामगाराच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. यानुसार, महागाई भत्त्यात आता 105 रुपये प्रति महिना असलेला भत्ता वाढून आता 210 रुपये करण्यात आला आहे. याचा जवळपास 1.5 कोटी कामगारांना दैनिक मजुरीमध्ये थेट लाभ मिळणार आहे.
1 एपिलपासून लागू होणार
मंत्रालयाने घेतलेल्या या महागाई भत्त्यात वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. यासंबंधांत 21 मे रोजी आदेश जारी करण्यात आले आहे. गंगवार यांनी ट्विटरवर व्हिडीओ जारी करून याची माहिती दिली आहे. याचा लाभ कंत्राटावर काम करणाऱ्या कामगारांनाही मिळणार असल्याचे ते म्हणाले.
महागाई भत्त्यातील वाढ ही CPI-IW च्या सरासरीनुसार करण्यात आली आहे. यासाठी जुलै 2020 ते डिसेंबर 2020 चे आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. याचा फायदा रस्ते बांधकाम, वास्तू बांधकाम, साफ सफाई, चौकीदार, कृषी आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना होणार आहे.
मुख्य आयुक्त लागू करणार
ही भत्ता वाढ कामगार मंत्रालयाचे मुख्य आयुक्त लागू करणार आहेत. त्यांच्या अंतर्गत काम करणारे निरिक्षण अधिकारी हा आदेश देशभरात लागू करणार आहेत.


