मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल हिने इंटेरिअर डिझायनर गौतम किचलूशी शुक्रवारी (३० ऑक्टोबर) लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच कुटुंबीयांना व मित्रमैत्रिणींना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
काजलने लाल रंगाचा लेहंगा तर गौतमने गुलाबी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे. सोशल मीडियावर काजल आणि गौतमच्या लग्नाचा हा फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.