जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शाहू नगरातील इंदिरानगर भागातील झोपडपट्टीजवळच्या कच्ची चाळीमधून गटारीचे पाणी साचले जात होते, याच भागाची महापौर जयश्री महाजन यांनी आज नागरिकांशी पाहणी करून चौकशी करण्यात आली.
शाहूनगर परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीनजीकच्या कच्ची चाळ परिसरातील ताज पान सेंटरजवळून जाणार्या मोठ्या गटारीत प्लास्टिक पिशव्या, गाळ तसेच कचरा साचला होता. त्यात या भागात वेळापत्रकाप्रमाणे आजच सकाळी पाणीपुरवठा झाला. त्यामुळे परिसरातील सांडपाणी वाहत येऊन गटार संपूर्ण चोकअप झाली. त्यामुळे त्यातील सांडपाणी एका घरात शिरल्याचे दृश्य महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांना या भागातून आपल्या गाडीतून जाताना पाहावयास मिळाले. त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून या प्रकाराबाबत उपस्थितांशी चौकशी करून पाहणी केली.
तसेच महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त पवन पाटील व त्यांच्या सहकार्यांना घटनास्थळी बोलावून घेत तसेच शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोलेंशी संपर्क करून संबंधित गटार संपूर्णपणे साफ करण्यासह त्यावर नव्याने स्लॅब कल्व्हर्ट बसविण्याच्या कामाचे प्राधान्याने इस्टिमेट तयार करून त्याची वर्कऑर्डर काढून हे काम आठ दिवसांत पूर्ण व्हावे व संबंधित गटार प्रवाही करावी, असे आदेश दिले. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन आज सकाळी उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळ्यातील प्रभागात सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून भोईटेनगर रेल्वेगेटकडून महापालिकेकडे गाडीतून जाताना त्यांना वरील चित्र पाहावयास मिळाले.
रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन संबंधित गटारीच्या कामासंदर्भात आदेश देऊन महापालिकेकडे जात असताना गोल्डसिटी हॉस्पिटलसमोरील रस्त्याच्या कडेला दोन-तीन ठिकाणी कचर्याचे मोठे ढीग पडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी तेथेच गाडी थांबवून संबंधित प्रभागासाठी नियुक्त आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांना बोलावून घेतले व कचर्याचे ढीग पडल्याचे दाखविले. त्यानंतर श्री.कांबळे यांनी तत्काळ सफाई कर्मचारी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने संबंधित कचर्याचे ढीग उचलण्याच कार्य हाती घेतले. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या या कार्यतत्परतेबाबत याप्रसंगी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.