जळगाव, प्रतिनिधी । ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईदनिमित्त शहरात वर्षानुवर्षे ईदगाह मैदान, तसेच विविध मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. यंदा मात्र ईदवर ‘कोरोना’चे सावट असल्याने घरच्या घरी ईद साजरी करावी आणि सोशल माध्यमांद्वारे ईदची नमाज अदा करावी, असे शासन निर्देश होते. या पार्श्वभूमीवर शहरातील ईदगाह मैदानावर प्रातिनिधीक स्वरूपात ईद साजरी झाली.
याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ईदगाह मैदानावर जाऊन इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव गफ्फार मलिक, मनियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, सामाजिक कार्यकर्ते हारून नदवी यासह मुस्लिम कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट, जळगावच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री.प्रताप शिकारे उपस्थित होते.
महापौर जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की देशासह राज्यात सर्वत्र ‘कोरोना’चे थैमान सुरू आहे. या संकटकाळात सर्व जातिधर्माचे लोक, विविध सामाजिक संघटना एकत्रित येऊन ‘कोरोना’मुक्तीचा हा लढा लढताना दिसत आहेत, हे राष्ट्रीय एकात्मतेचेच प्रतीक आहे. आज मी अक्षय तृतीया व रमजान ईदच्या अनुषंगाने परमेश्वर, अल्लाहला प्रार्थना करते, की जळगावसह संपूर्ण देशवासीयांना या ‘कोरोना’रूपी संकटातून लवकर मुक्ती दे अन् सर्वांना शांत, सुखी अन् आनंदाचे जीवन पूर्ववत जगू दे. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्ताने खूप-खूप शुभेच्छा!