जळगाव – शहरात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांनी संताप व्यक्त करीत रस्त्यावर ठिय्या मांडला. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. गणपती हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. डाॅक्टरांच्या चुकीमुळे रुग्णाचा जीव गेला असा आराेप करीत जाेपर्यंत दाेषींवर कारवाई हाेत नाही ताेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रुग्णाच्या नातलगांनी घेतला.
जळगाव शहरातील गणपती हाॅस्पिटलमध्ये दौलत नगरातील पंकज कृष्णा बाविस्कर (वय ३९) या तरूणाचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंजेक्शन आणूनही ते वेळेवर दिले नाही. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला. कारवाईसाठी त्यांनी रात्री ९ वाजता रस्त्यावर ठिय्या मांडला हाेता.
पंकज बाविस्कर यांना १ मे रोजी इकरामधून गणपती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. या सर्व प्रकाराची चौकशी करू, असे जयश्री महाजन यांनी सांगितले. यावेळी डॉ. ललित पाटील यांनी रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८८ टक्के झाली असल्याचे सांगत माहिती दिली. पंकज यांच्या वडिलांचा २१ दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. वडिलांपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाला.