जळगाव, प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा समुपदेशक मिनाक्षी चौधरी यांनी बुधवारी 5 मे रोजी ३१ व्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केला. याबाबतचा फॉर्म भरून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.
मिनाक्षी चौधरी या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहर शाखेत विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह आहेत. याशिवाय अंनिसच्या मानसमित्र प्रकल्पात समुपदेशक आहेत. तसेच जोडीदाराची विवेकी निवड विभागाची जिल्हा कार्यवाह आहे. विलीनी मीडिया सर्विसेसचे संचालक आहेत. गेली ८ वर्षांपासून ते कोल्हापूर, सांगली व जळगाव येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
देहदान हे महत्वाचे कार्य आहे. मात्र आजदेखील समाजात देहदानाविषयी गैरसमज आहेत. ‘मरावे परी देहरूपी उरावे’ या उक्तीनुसार मिनाक्षी चौधरी यांनी संकल्प केला आहे. सर्वसामान्यांच्या मनात देहदान व अवयवदानावषियी अनेक शंका आहेत. त्यामुळे देहदानप्रति जनजागृती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन मिनाक्षी चौधरी यांनी देहदानाचा फॉर्म अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे बुधवारी भरून दिला. यावेळी जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन व प्रात्यक्षिकासाठी देह मिळत नाही. त्यामुळे समाजात तज्ज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत यादृष्टीने देहदान केल्याचे मिनाक्षी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.