जळगाव – देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही. लोकांनी आपल्या शरीराची काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्भवतो. आता किडनीच्या विकारांना कसं दूर ठेवावं हे जाणून घेऊया.
फास्ट फुडचा अतिरेक आणि बैठे काम करण्याची सवय, त्याचवेळी व्यायामाचा कंटाळा किंवा त्यासाठी वेगळा वेळ न देणे हे डायबेटिस, हायपरटेन्शन, जठरासंबंधीचे विकार आणि स्थूलपणा या आजारांना निमंत्रण ठरते आहे. इतकंच नव्हे, तर हे आजार लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढू लागले असून, या आजारांमुळे किडनी आणि त्यासंबंधीचे विकार बळावू लागले आहेत.
याची प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे –
सोडियमचे प्रमाण असलेले अन्न खाणे.
सोडायुक्त शीतपेये जास्त प्रमाणात पिणे.
जेवणाच्या विचित्र वेळा विशेषकरून रात्री उशिरा उच्च कार्बोहायड्रेटचा आहार घेणे.
जेवल्या जेवल्या झोपायला जाणे.
किडनी विकाराने ग्रस्त असलेले देशभरातील 60 टक्के रुग्ण हे एकतर डायबेटिस किंवा उच्च रक्तदाब या विकारांनी पछाडलेले असतात. त्यातही मधुमेह हे किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे. यामुळे किडनीजवळील तुमच्या मोठ्या रक्तवाहिन्या आणि लहान रक्तवाहिन्या निकामी होतात.
त्याचबरोबर उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, स्थूलपणा, प्रतिकारशक्ती कमी असणे, मूत्रपिंडातील संसर्ग, मूत्रपिंडाचे काही कौटुंबिक आजारही किडनी विकारांना कारणीभूत ठरतात.
या सर्वाचा परिणाम किडनीवर होतो. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले न गेल्याने त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरात टाकावू द्रव्यपदार्थाचं प्रमाण साठत जातं. त्यामुळे मग डायलिसिस करण्याची वेळ येते किंवा किडनी रोपण करण्याची वेळ येते. तीव्र मूत्रपिंडाचा विकार (सीकेडी) हा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. पण, हा विकार प्रामुख्याने 40 ते 50 वयोगटांतील व्यक्तींमध्ये दिसून येतो. देशातील 10 टक्क्यांहून अधिक लोकांना तीव्र मूत्रपिंडाचा विकार असून, हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तर आकडेवारी असं सांगते की, दरवर्षी भारतात सुमारे तीन ते चार लाख लोकांना किडनीरोपणाची आवश्यकता आहे. मात्र त्यातील एक टक्काच रुग्णांना किडनी रोपणासाठी दाते उपलब्ध होतात व त्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात.
जनजागृतीचा अभाव, डायबेटिस आणि तीव्र मूत्रपिंडाचा विकार यांच्या अभद्र युतीमुळे हे अपयश पदरी पडते. आहारामध्ये काही आवश्यक बदल आणि काही आरोग्यदायी सवयी यांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकता. विविध प्रकारचे आवश्यक बदल हे प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात. मग त्यांना मूत्रिपडाचा विकार असो वा नसो. आणि ते केवळ त्या व्यक्तलाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यदायी जीवनशैलीलाही उपयुक्त ठरतात!
पुढील पथ्ये पाळतील तर तुम्ही तुमची किडनी तंदुरुस्त ठेवू शकता :
रक्तातील ग्लुकोज आवाक्यात ठेवा.
तुमचा रक्तदाब नियमित ठेवा. तुम्ही जर रक्तदाबासाठी काही औषधे घेत असाल, तर ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. सकस आहार घ्या आणि तुमच्या आहारतज्ज्ञाने ठरवून दिलेल्या आहाराप्रमाणे घ्या. वर्षातून किमान एकदा तरी किडनीसंदर्भातील चाचण्या करून घ्याव्यात.
वारंवार पेनकिलर्स घेणे टाळावे. आर्थरायटीस रोगामध्ये नॉन स्टेरॉइड दाहकविरोधी औषधांचे दररोज सेवन केल्यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते. तुम्ही जर आर्थरायटीजसारख्या आजाराने ग्रस्त असाल आणि अशा प्रकारची औषधं तुम्हाला घ्यावी लागत असतील, तर यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि किडनीला कोणतीही हानी पोहोचणार नाही अशा तऱ्हेने तुमच्या आजारावर तोडगा काढा. मूत्राशय किंवा किडनी विकारांसाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. मद्यपानाला रामराम करा.
धूम्रपानामुळेही तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे किडनीचे विकार उद्भवू शकतात. चरबीयुक्त आहार घेणे टाळा. शरीराचे वजन कमी ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबही नियमित राहू शकेल. उच्च तणावाच्या जीवनशैलीत राहणे टाळा. त्यामुळे हायपरटेन्शनचा विकार जडू शकतो.