जळगाव – शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कामाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी शिवकॉलनी आणि दत्त कॉलनीत पाहणी केली. कामाबाबत यावेळी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम करताना कामाची गुणवत्ता चांगली ठेवा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. बुधवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी शहर अभियंता अरविंद भोसले, नगरसेवक प्रा.डॉ.सचिन पाटील, अभियंता योगेश वाणी, प्रभाग अधिकारी विलास सोनवणे व नागरिक उपस्थित होते.
रस्त्यांची डागडुजी करताना आणि चाऱ्या बुजविताना कामाची गुणवत्ता राखावी तसेच परिसरातील नागरिकांनी काही दुरुस्ती, सुधारणा सुचविल्यास त्या देखील करून घ्याव्या. मनपा अधिकाऱ्यांनी काम सुरू असताना वारंवार भेट देत कामाचा दर्जा तपासावा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.