जळगाव, प्रतिनिधी :- कृषी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारींना विमा कवच द्यावे. अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या दि. 29 मे 2020 नुसार फ्रंटलाईन वर्कर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यास 50 लाखाचे विमा कवच राज्य शासनाने लागू केलेले आहे. वरील नियमानुसार कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आदी कर्मचारी यांनी लॉक डाऊन काळात शेतमाल भाजीपाला, फळे ,धान्य आदि शेतमाल खरेदी विक्रीची व्यवस्था उभारणे, पोखरा सारखी योजना तसेच राज्य व केंद्र शासनाने दिलेले वेगवेगळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ करीत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्दिष्टे देऊन ते पूर्ण करण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना मदत करीत आहे. त्याच प्रमाणे शासनाला वेळोवेळी खरीप हंगाम पूर्व नियोजनाकरीत क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा लागतो आहे.
या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी आज खा. उन्मेश पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खा. उन्मेश पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागातील सुमारे 2000 कर्मचारी अद्यापपावेतो कोरोनाबाधित झालेले आहेत. यापैकी 60 ते 65 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोरोनाबाधित झाल्याने मृत्यू झाले आहेत. एकट्या माझ्या मतदार संघात ११ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची घटना घडली आहे. ही बाब कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. अशा कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे अकाली निधन झाल्याने परिवारावर आघात झाला असल्याने कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे परिवार चिंतेत असल्याने आपण तात्काळ कोरोनामुळे निधन झालेले कर्मचारी यांना 50 लाखाचे विमा कवच मंजूर करून त्यांच्या वारसांना अनुकंपाच्या नियमानुसार शासनाच्यासेवेत सामावून घ्यावे. तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्यात यावे, आपल्या सारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांकडून याबाबत तातडीने कार्यवाही होईल अशी आशा करतो. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.