जळगाव- जळगावकरांची महापालिकेच्या माध्यमातून विविध समस्या व तक्रारींसंदर्भात होणारी दमछाक व त्यातून होणारा मनःस्ताप आता कायमचा थांबणार आहे. त्याचे कारण जळगाव शहर महानगरपालिकेच्या पुढाकारातून ’महापौर सेवा कक्ष’ स्थापन झाला असून, तो जनतेसाठी येत्या 14 मे 2021 अर्थात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. तसेच महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या दैनंदिन विविध कार्याची जनतेला माहिती व्हावी व हे कार्य जनतेपर्यंत तत्काळ पोहोचावे, या उद्देशातून ’सोशल मीडिया सेल’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जळगावकरांना त्यांच्या समस्यांची उकल आता घरबसल्या करता येऊ शकेल.
जळगाव शहर महापालिकेतर्फे काल 1 मे 2021 अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ’महापौर सेवा कक्षा’चे उद्घाटन तसेच महापौर जयश्री महाजन यांच्या ’सोशल मीडिया सेल’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, अनंत (बंटी) जोशी, प्रशांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, सूत्रसंचालक गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून जनतेच्या स्वच्छता/प्रदूषण, पाणीपुरवठा, पथदिवे/लाईट, रस्ते, गटार/मलनिस्सारण, अतिक्रमण, विवाह नोंदणी, घरपट्टी/पाणीपट्टी, जन्म/मृत्यू नोंदणी, वैकुंठरथ/अॅम्ब्युलन्स, अग्निशामक, आपत्कालीन सेवा इत्यादींसंदर्भातील समस्या/तक्रारींचे निराकरण संबंधित विभागांतील अधिकार्यांमार्फत केले जाऊन जनतेला घरबसल्या आपल्या समस्या/तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याबाबतची माहिती फोनवरून मिळणार आहे. तसेच महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या ’सोशल मीडिया सेल’द्वारे त्यांच्या दैनंदिन कार्याची माहिती जनतेला त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटस्अॅप व यु-ट्यूबला भेट दिल्यानंतर कळणार आहे. त्यामुळे जनतेने या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करावे, असेे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.