जळगाव – आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा शुभारंभ करतांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केले.
या योजनेचे जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीने स्वागत केले आहे. जळगांव जिल्ह्यात आदिवासी बहुल तालुके असून अनेक आदिवासी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजने अंतर्गत आदिवासी कुटूंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. ऑनलाईन पद्धतीने आज एकाचवेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. आदिवासी विकासासाठी राज्य शासन व आदिवासी विकास मंत्री एड. के.सी.पाडवी नेटाने काम करीत आहेत.
या योजनेत २ हजार रूपये रोख व २ हजार रुपयांच्या वस्तु देण्यात येणार असल्याने कोरोना काळात ही मदत खूप मोलाची ठरणार आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे, पावसाळा तोंडावर आहे. आदिवासी क्षेत्र हे जंगलक्षेत्र आहे जिथे अधिक पाऊस पडतो. त्यामुळे रोख आणि वस्तु स्वरूपातील मदत आदिवासींसाठी मोलाची ठरणार आहे. खावटी कर्ज योजना पुनर्जीवित करून कर्जाऐवजी अनुदान देणारी ही योजना कोरोनाच्या संकटकाळात राज्याने आणली आहे. यासाठी शासनाने विभागाला ४८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
आदिवासींच्या जीवनमानात बदल करून त्यांचा विकास करण्यासाठी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी १२ लाख कुटुंबांना या योजनेचा ऑनलाईन लाभ राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. गरीब आदिवासीं च्या घरापर्यंत पोहोचणारी चांगली योजना शासनाने आदिवासींसाठी आणली आहे. आदिवासी बांधवाना स्वतःच्या पायावर उभे करणे हेच या शासनाचे ध्येय आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्या साठी पायाभूत कामे करण्यावर भर देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री यांनी नमुद केले आहे.
या योजनेचा लाभ जळगांव जिल्ह्यातील आदिवासी बांधव यांना मिळणार असल्याने राज्य शासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचे आभार जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एड. संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी, मा.खा.डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव डी. जी.पाटील,जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी आभार व्यक्त केले आहेत.