मुंबई, वृत्तसंस्था :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सलग १३ महिन्यांपेक्षा जास्त काळ ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी १ मेपासून लागू होणार आहे. जूनमधील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारी २८ जून रोजी शाळा सुरू होतील.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी एप्रिलपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून सतत १३ महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षक दिले जात आहे. ऑनलाईनचा कोणताही अनुभव नसताना झूम, गुगल मिट तसेच इतर प्लॅटफॉर्मचा वापर करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन ऑफलाईन शिक्षण दिले. सातत्याने सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थीदेखील कंटाळले होते. त्यामुळे यंदा शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत होती. या धर्तीवर राज्य सरकारने १ मेपासून १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवारी १४ जूनपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांच्या सुट्ट्या समायोजनाने संबधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने जाहीर करण्यात येतील. मात्र या सुट्ट्या जाहीर करताना माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई यांना दिल्या आहेत.
मुंबईतील शिक्षकांना गावी न जाण्याच्या सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासंदर्भातील उपाययोजनांसाठी विभाग स्तरावरून शिक्षकांची कोणत्याही क्षणी मदत घेण्यात येऊ शकते. कोणत्याही क्षणी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे मे २०२१च्या उन्हाळी सुट्टीमध्ये सर्व मुख्याध्यापक, इनचार्ज, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुंबई सोडून आपल्या गावी जाऊ नये. कोविड कर्तव्यावर हजर न झाल्यास व कामात कुचराई केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्यात येईल, असे पत्र मुंबई महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.