मुंबई, वृत्तसंस्था :- ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाय योजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
नियमावलीनुसार 15 मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
नियमावलीत नेमके नियम कोणते?
1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार
15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार
18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार