जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठात कागदांच्या कंत्राटात कोट्यवधीचा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्याची मागणी एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू ई वायूनंदन यांच्याकडे केली आहे.
एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू ई वायूनंदन यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून त्यांना विद्यापीठातील कागद घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात झालेल्या चर्चेत देवेंद्र मराठे यांनी नमूद केले आहे की, गेल्या चार वर्षांपासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचे दिसून आलेले आहे. विद्यापीठांमध्ये मागील दरवाजाने नियुक्त झालेले सदस्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना प्रशासकीय काम करू देत नाहीत व कुलगुरूंना केवळ दबावाखाली ठेवत मनमानी कारभार करीत असल्याचे मागील काळामध्ये दिसून आलेले आहे.
माजी कुलगुरू डॉ पी. पी. पाटील यांच्या कार्यकाळामध्ये कुलगुरू म्हणून डॉ. पाटील यांना त्यांच्या अवतीभवती असलेल्या व मागील दरवाजाने प्रवेश केलेल्या लोकांनी कधीच प्रशासकीय काम योग्य पद्धतीने करू दिले नाही. याच लोकांच्या त्रासाला कंटाळून व कुलगुरूंना समोर ठेवून विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कामांमध्ये व आर्थिक गैर कारभारामध्ये कदाचित आपला बळी दिल्या जाईल याच भीतीने माजी कुलगुरू यांनी आपल्या पदाचा मुदतपूर्व राजीनामा देखील दिल्याचे आपण पाहिले आहे. तसेच काही प्रामाणिक व कानाच्या वरच्या लोकांना राजनामा द्यायला भाग पाडले. त्या प्रामुख्याने तक्रार निवारण समिती चेअरमन न्यायमुर्ती श्री. व्यवहारे यांनी तर त्यांच्या राजीनाम्यातच या दबावा बाबत स्पष्ट सांगितले आहे. आता नवीन कुलगुरू नियुक्तीसाठी शासनामार्फत प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वायुनंदन सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाचा व कवियत्री बहिणाबाई विद्यापीठाचा कारभारामध्ये बराचसा फरक आहे.
मुक्त विद्यापीठामध्ये प्राधिकरण अस्तित्वात नाहीत. तसेच मुक्त विद्यापीठामध्ये सिनेट प्रक्रिया अस्तित्वात नाही. त्यामुळे जळगाव विद्यापीठाच्या व मुक्त विद्यापीठाच्या कामकाजामध्ये बराच फरक असल्यामुळे बर्याच गोष्टींविषयी प्रभारी कुलगुरू यांना माहिती अपूर्ण आहे. व त्याचाच फायदा घेऊन विद्यापीठांमधील मागील दरवाजाने आलेली मंडळी त्यांनी केलेला मागील काळातील काळाबाजार येणार्या काळामध्ये देखील लपविला गेला पाहिजे.
त्या अनुषंगाने आतापासूनच प्रत्येक प्राधिकरणावर ती त्याच पद्धतीने विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर ती आपल्याच मर्जी मधील लोक अजून अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कसे नियुक्त करता येतील या पद्धतीची प्रक्रिया जोरात राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने प्रभारी कुलगुरू पूर्णवेळ विद्यापीठात नसल्यामुळे व त्यांना बरीच माहिती नसल्याचा फायदा घेऊन पात्रता नसलेल्या सदस्यांना देखील केवळ स्वतःच्या मर्जीतील असल्यामुळे व आगामी काळामध्ये केलेला काळाबाजार लपविला गेला पाहिजे या हेतूपोटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य पदी तसेच विद्यापीठाच्या विविध विभागाच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात येत आहे.
देवेंद्र मराठे यांनी पुढे म्हटले आहे की, विद्यापीठाच्या काही कर्तव्यनिष्ठ अधिकार्यांनी की ज्यांना विद्यापीठाचा हा भ्रष्टाचार बघवले गेला नाही व केवळ विद्यापीठाच्या हिता करता त्यांनी काही पुरावे आमच्या संघटनेकडे दिले व त्यामधून असे निदर्शनास आले की विद्यापीठांमधील परीक्षा विभागांमधील प्रत्येक कागद हा लाखो रुपये किमतीइतका झालेला आहे. विद्यापीठांमधील ऑक्टोंबर २०२० चे परीक्षेचे बिल तब्बल पाच कोटी रुपये इतके झालेले होते. गेल्या चार वर्षांपासून एकाच पार्टीला परीक्षा विभागाचे काम कुठलीही निविदा प्रक्रिया पार न पाडता दिल्या जात आहे.
इथेच संशयाला जागा निर्माण होते. खरं तर विद्यापीठात ऑक्टोंबर २०२० या कालावधीमध्ये परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झालेली होती. सहाजिक आहे, ऑनलाइन परीक्षेचा खर्च हा ऑफलाइन परीक्षेपेक्षा कधीही कमी असला पाहिजे..! परंतु ऑक्टोंबर २०२० या ऑनलाईन परीक्षेचा खर्च बिल हे तब्बल पाच कोटी रुपयांचे होते. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू यांनी सदर परीक्षा विभागाचे कामकाज ज्या कंत्राटदाराकडे होते, त्या पार्टीला तडजोडीसाठी विद्यापीठांमध्ये बोलावले.चर्चेअंती सदर पार्टीने विद्यापीठाचे पाच कोटी रुपयांपैकी तब्बल ७५ लाख रुपये बिल हे कमी केले.
इथे दुसरी संशयाची जागा निर्माण होते… जर विद्यापीठाचे परीक्षेचे बिल हे योग्यरीत्या दाखल केलेले असते तर त्यामध्ये एक रुपया देखील कमी झाला पाहिजे नव्हता. परंतु समोरील पार्टीने तब्बल ७५ लाख रुपये कशाच्या आधारावरती सूट दिले..? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे परीक्षा विभागांमधील ऑनलाईन परीक्षा असल्या नंतर देखील पाच कोटी रुपयांचे बिल म्हणजेच विभागातील प्रत्येक कागद हा लाखो रुपयांचा आहे… असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.. घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू डॉ वायुनंदन यांच्याकडे केली.
दरम्यान, चौकशीची मागणी केल्यानंतर काही गोष्टी प्रभारी कुलगुरू यांना माहिती नव्हत्या त्यांच्या कानी सर्व गोष्टी घातल्यानंतर मी दीक्षांत समारंभासाठी उद्या संध्याकाळी जळगावात दाखल होत आहे. आपण एक तारखेला मला भेटायला या आपण चर्चा करून सदर प्रकरणात विषयी चौकशी करू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना प्रभारी कुलगुरू यांनी दिले.