एरंडोल – या भीषण कोरोना काळात गेल्या वर्षापासून आपल्या अँब्युलन्स च्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी देवदूतासारखी दिवसरात्र सेवा करणाऱ्या विक्की खोकरे यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य, गोरगरीब कोरोनाग्रस्तांसाठी संपूर्ण कोरोना काळात रोज फलाहार(फळे) देण्याची संकल्पपूर्ती केली असून त्यासाठी त्याने पंचवीस हजार रुपये रोख फळे विक्रेत्याला देऊन आज पासून फळ वाटपाला सुरूवात केली.
त्यावेळी रुग्णालयाचे मेडिकल अधिकारी डॉ मुकेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते फकिरा खोकरे, अष्टविनायक कोविड केअरचे संचालक समाधान पाटील,डॉ महेश पाटील,OS पंकज पाटील, सुनिल खोकरे,रविंद्र पाटील, विकी खोकरे,बिरजू सिरसे, प्रसन्न परदेशी, करन केदार,जय बेद आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप
विक्की खोकरे हा तरुण या कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब रूग्णांना रूग्णालयात दाखल करणं, त्यांना बेड मिळवून देण्यापासून ते बरा होईपर्यंत सेवा देण्याचं काम अव्याहत करतो आहे.त्यासाठी एका रुग्णाला धुळ्याला पोहोचवत असताना आॅक्सीजन सिलेंडरचा काॅक तोंडावर आदळून तो गंभीर जखमी झाल्यावही त्याने आधी रूग्णाला रूग्णालयात पोहोचले नंतरच स्वतःवर उपचार केले.सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या दृष्टीने तो केवळ कोरोना योद्धाच नव्हे तर रूग्णांसाठी देवदूतच समजला जातो.
एरंडोल रूग्णालयात रोज पंचवीस ते तीस आॅक्सीजन लेव्हल कमी असलेले गंभीर रूग्ण दाखल होत आहेत. हे रूग्ण ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब परिवारातून असल्याने त्यांना पोषक आहार मिळणं शक्य नाही, हे ओळखून विक्कीने फळ विक्रेत्याला पंचवीस हजार रुपये देऊन या रूग्णांना रोज फल आहाराची व्यवस्था केली. जो पर्यंत कोरोना असेल, जो पर्यंत रूग्ण असतील तो पर्यंत फल आहार वाटप सुरु ठेवण्याचा त्याचा संकल्प तो सिद्धीस नेणार आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एक दिवस फळ वाटप करून फोटो काढून प्रसिद्धी करतात पण कोरोना काळातील विक्कीचे हे दातृत्व मोलाचा संदेश देणारं आहे.