जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या कोविडच्या आपत्तीमध्ये पायाभूत सुविधांसह कोरोनाच्या प्रतिकारासाठी जळगावकर नागरिकांना सर्वतोपरी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले. उपमहापौरपदाची सूत्रे सांभाळण्यास आज एक महिना झाल्यानिमित्त त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा प्रस्तुत केला.
याबाबत वृत्त असे की, १८ मार्च रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष निवड सभेत महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आला. तर दिनांक २२ मार्च रोजी दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदाचा कार्यभार सांभाळला होता. आज २२ एप्रिल रोजी त्यांच्या कार्यकाळास एक महिना पूर्ण झाला. यानिमित्त प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या निवेदनात उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महिनाभरातील कामांचा आलेख प्रस्तुत केला.
कुलभूषण पाटील म्हणाले की, सध्या कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून याच्या प्रतिकारासाठीच्या उपाययोजनांना आम्ही प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने शहरातील विविध कोविड केअर सेंटर्समध्ये सर्वतोपरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या प्रतिकारासाठी याचे वेळीस निदान होणे हे सर्वात महत्वाचे आहे. या अनुषंगाने महापालिका प्रशासनातर्फे नूतन मराठा महाविद्यालयत, बस स्टँड व एमआयडीसी आदींसारख्या ठिकाणी रॅपीड अँटीजेन चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर येथे पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकांची सुविधा देखील उपलब्ध केलेली आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमधील भोजनाची तक्रार आली असता आपण थेट भेट देऊन याचे निराकरण केल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली.
उपमहापौर पुढे म्हणाले की, सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा असल्याने आपण महापौरांसह पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली असून त्यांनी आपल्याला पुरेसा प्राणवायू मिळेल असे आश्वस्त केले आहे. तर सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमुळे संकुलांमधील दुकाने बंद असल्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. जळगावकरांच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करण्यासाठी आपण सकाळी पिंप्राळा येथील संपर्क कार्यालयात तर दुपारी १२ ते ५ या कालावधीत उपमहापौर कार्यालयात असतो. येथे नागरिक तक्रारी करू शकतात. तर कुणाला तातडीची आवश्यकता असल्यास आपल्याला ८२०८७७७७०४ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या समस्येचे निराकरण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तर जळगावकरांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी केले.