मुंबई (वृत्तसंस्था) – रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसेच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे. राज्याची बल्क ड्रग पार्क व वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क याची प्रकल्प किंमत रु. 2442 कोटी इतकी तर वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कची प्रकल्प किंमत 424 कोटी रुपये इतकी आहे.
रायगड जिल्हयातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क मध्ये स्थापन होणाऱ्या औषध निर्मिती उद्योग तसेच ऑरिक सिटी औरंगाबाद येथील वैद्यकिय उपकरण निर्मिती पार्क मधील उद्योगांना वरीलप्रमाणे विशेष प्रोत्साहन योजना 5 वर्ष कालावधीकरिता लागु राहिल.
या योजनेत केंद्र शासन 3 बल्क ड्रग पार्क व 4 वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क उभारणार आहे. बल्क ड्रग पार्कसाठी मुलभूत सुविधा उभारण्याकरिता जास्तीत जास्त रुपये 1000 कोटी किंवा प्रकल्प अहवालातील एकूण खर्चाच्या 70% अनुदान देण्यात येणार आहे व वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क या योजनेकरीता रु. 100 कोटी अनुदान सामुहिक मुलभूत सुविधा उभारण्याकरिता केंद्र शासन देणार आहे.
रायगड जिल्हयात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व ऑरिक सिटी औरंगाबाद येथील वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क
i) औद्योगिक विकास अनुदान- राज्यात होणाऱ्या प्रथम विक्रीच्या 100 टक्के राज्य, वस्तु व सेवा कर
ii) विद्युत शुल्क माफी- अनुदान उपभोगण्याच्या कालावधीपर्यंत
iii) मुद्रांक शुल्क माफी- गुंतवणूक कालावधीतील भुखंड खरेदी, भाडेपट्टा, बँक लोन करिता गहाण खत इत्यादि सर्व प्रयोजनार्थ
iv) विद्युत दर सवलत – रु. 1.5 प्रति युनिट 10 वर्षाकरिता
v) अनुदान उपभोगण्याचा कालावधी- 10 वर्ष
vi) सदर विशेष प्रोत्साहने घटकानी केलेल्या पात्र भांडवली गुंतवणूकीच्या 100 टक्के मर्यादेत राहतील व वार्षिक प्रोत्साहनांची मर्यादा पात्र प्रोत्साहने भागिले अनुदान उपभोगण्याचा कालावधीच्या सरासरीएवढा राहील.
vii) लघु, लहान व मध्यम घटकांना सामुहिक प्रोत्साहन योजना 2019 प्रमाणे 5% व्याजदर सवलत अनुज्ञेय राहील.
अजून वाचा
शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये